ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महापालिका कंत्राटी कामगारांचे आज कामबंद आंदोलन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महापालिका कंत्राटी कामगारांचे आज कामबंद आंदोलन.

इचलकरंजी:

इचलकरंजी महापालिका कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १९ नोव्हेंबरपासून महापालिका गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दोन दिवस लोटूनही महापालिकेकडून कोणतीही दखल न घेतल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी असून, उद्या सर्व कंत्राटी कामगार कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.

औद्योगिक न्यायालयाने कोणत्याही कामगारांना कामावरून कमी करू नये, असे स्पष्ट आदेश दिले असतानाही पाणीपुरवठा विभागातील सहा कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. किमान वेतन कायदा लागू करावा, प्रॉव्हिडंट फंड व ESIC योजना अंमलात आणावी तसेच अनेक वर्षे काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करावे, या मागण्यांसाठी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल आहे. यावरील विशेष अर्जांना न्यायालयाचा अनुकूल प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेने सांगितले.

काही अधिकारी कंत्राटी कामगारांबाबत “हे महापालिकेचे कामगार नाहीत, कंत्राटदाराचे आहेत” असा गैरसमज जनतेमध्ये पसरवत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. कंत्राटी कामगार कायदा १९७१ नुसार काम चालणाऱ्या परिसरातील मुख्य मालक जबाबदार असतो. पाणीपुरवठा हे महापालिकेचे विधिसंमत काम असून नागरिकांकडून पाणीपट्टी आकारली जाते, त्यामुळे या कामगारांचा महापालिकेशी संबंध नाही, असे म्हणणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असल्याचे संघटनेचे मत आहे.

यापूर्वी अनेक कंत्राटदार बदलले तरी कामगारांना कमी करण्यात आले नव्हते; मात्र 1 नोव्हेंबरपासून आलेल्या नवीन कंत्राटदारास काही व्यक्तींनी दिशाभूल करून कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. जर कामगारांना कमी करण्याचा अधिकार कंत्राटदारांना आहे, तर यापूर्वीच्या कोणत्याही कंत्राटदारांनी असे का केले नाही, असा सवालही करण्यात आला आहे.

दोन दिवस आमरण उपोषण झाल्यानंतरही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने उद्या सर्व कंत्राटी कामगार कामबंद आंदोलन करणार असून, सकाळी दहा वाजता महापालिका गेटवर जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत, असे प्राचार्य ए. बी. पाटील, अध्यक्ष यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा