ICHMH51NEWS.IN
9921600800

भारताचे संविधान व आजचा भारत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भारताचे संविधान व आजचा भारत

इचलकरंजी:
भारत सरकारने २०१५ मध्ये २६ नोव्हेंबरला अधिकृतपणे संविधान दिनाची घोषणा केली आणि हा दिवस नागरिकांना संविधानाचा अभ्यास मुल्यांची जाणीव व अधिकार कर्तव्यांचे स्मरण करुन देण्याचा राष्ट्रीय संकल्प बनला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १०च्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यानंतर त्यांचा परळच्या चाळीमध्ये सत्कार करण्यात आला होता त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे होते त्यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेव आंबेडकरांना स्वलिखित गौतम बुध्द हे पुस्तक भेट म्हणून दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यावेळी जर हे पुस्तक माझ्या हातामध्ये नसते तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून मी उभा राहिलो नसतो या वाक्यावरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानांबद्दल आदर दिसून येते.
संविधान दिन जवळ आला की देशभरात कार्यक्रम, भाषण, फलक, प्रास्ताविक वाचन अशी गती वाढते पण दरवर्षी मला वाटते की हा दिवस उत्सवांपैकी अधिक आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आपण संविधान वाचलो किंवा न वाचलो पण त्यातील मुलभुत मुल्यांचा आपण घेतलेल्या अनुभवाचा आणि त्यांची प्रत्यक्षात जाणवलेली उणीव ही गोष्ट अधिक बोलकी असते. संविधान हा प्रत्येकाच्या हातातील दस्तऐवज नसला तरी प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करणारा श्वास आहे. नागरिक म्हणून मी जे पाहतो, अनुभवतो त्याच्या संगमातून काही प्रश्न मनात कायम उभे राहतात.
आपल्या भारताचे संविधान दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आले आणि देशाने लोकशाही, समता, न्याय व स्वातंत्र्य या मुल्यांवर आधारलेली आधुनिक राष्ट्राची निर्मिती केली आणि या ऐतहासिक दिवसाच्या स्मरणार्थ १९७९ पासून संविधान दिनाच्या स्वरुपात काही मर्यादित उपक्रम राबविले जातात. पण मात्र २०१५ मध्ये सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केले आणि हा दिवस नागरिकांना संविधानाचा अभ्यास, मुल्यांची जाणीव, अधिकार व कर्तव्य यांचे स्मरण करुन देण्याचा राष्ट्रीय संकल्प बनला. संविधान दिन हा फक्त इतिहासाचा दिवस नसुन आपण दिलेल्या लोकशाहीच्या वचनाबद्दल आत्मपरीक्षण करण्याचा व वर्तमान समाज संविधानाच्या मुल्यांना किती प्रमाणात जगतो याचा प्रश्न विचारण्याचा दिवस आहे.
भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता हे चार शब्द आपल्या राष्ट्राचे बौध्दिक आणि नैतिक भान तयार करतात पण समाजातील वास्तव यांच्या उलट सावल्या दाखवत राहत. न्यायाच्या शब्दासोबत असमान संधीची कडु जाणीव राहते. स्वातंत्र्याच्या बाजूला सामाजिक बंधनाची भिंत दिसते. समतेच्या विरुध्द अजुनही विषमता आपला आकार वाढवत आहे व बंधुत्वाच्या ऐवजी मतभेद व गटबाजी समाजात जास्त जोरात ऐकू येते. संविधानामुळे मुल्य जितके उजळते समाजातील व्यवहार तितकाच धुळीने माखलेला अशीच दुहेरी दुनिया अनेकदा पुढे येते. कार्यक्रमात शब्दांना गोडवा येतो पण प्रत्यक्ष जीवनात त्याच शब्दांचा भार वाटू लागतो. आपल्या राष्ट्राची मोठमोठी तंत्रज्ञान दैनंदिन वर्तनात उतरली नाहीत तर भारताच्या संविधानाची शक्ती ही कागदापुरतीच राहते.निवडणुक हा लोकशाहीचा उत्सव असला तरी संविधानाचे यश रोजच्या जीवनात दिसायला हवं आपण वाहतुकीचे नियम पाळतो? का स्त्रियांशी आदराने बोलतो का? विविधतेला मान देतो का? मतभेदांना शत्रुत्व न मानता त्याची चर्चा करतो का? हे छोटे प्रश्न संविधानाच्या मोठ्या मुल्यांची वास्तवि चाचणी आहे. कार्यक्रम आणि भाषण संविधानाचा गौरव वाढवतात पण त्याबद्दलचे वर्तवणूक त्याचा अर्थ ठरवितात. आपण नागरिक म्हणून आपल्या छोट्या कृतींमधून संविधान जगायला सुरुवात झाली की समाजामध्ये बदल घडू शकतो.
आजची तरुण पिढी विचारणारी समतावादी व न्यायत्रिय आहे. तरीही या पिढीत प्रचंड शक्ती आहे की जर आपण त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या निर्णयाचा आदर केला तर या भारतीय संविधानाचे भविष्य ठरवू शकते. आज भारताला संविधान नको तर नवीन दृष्टिकोन हवाय. संविधानाच उत्सव साजरा करण्यापेक्षा संविधान जगण्याची वेळ आहे. संविधानाचा प्रकाश फक्त फलकांवर नव्हे तर मनावर पडला तर भारताची लोकशाही अधिक प्रभावशाली व संवेदनशील बनेल.

भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

करण शिरोले,इचलकरंजी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा