कौटुंबिक वैमनस्यातून चुलत मेव्हण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला; १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी
इचलकरंजी
इचलकरंजीतील नदीवेश नाका परिसरात कौटुंबिक वादातून चुलत मेव्हण्यावर चाकूने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री स्वामी समर्थ केंद्रासमोर घडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. गंगा दिषक कामी (रा. शेळके मळा, इचलकरंजी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी आदित्य सोनुले (रा. नदीवेश नाका) हा जखमी प्रसाद दीपक कामी (वय १७) याचा चुलत मेहुणा ठरतो. एका वर्षापूर्वी आरोपीचा विवाह प्रसादच्या चुलत बहीणीशी झाला असून दोघांत वारंवार वाद होत होते. त्या वादांबाबत प्रसादने आरोपीला पत्नीशी भांडण करू नकोस असे समज दिल्याचा राग आरोपीने मनात धरला होता.
घटनेच्या रात्री आरोपीने प्रसादला अडवून प्रथम कानाखाली चापट मारली आणि “आता तुला खल्लास करून टाकतो” अशी धमकी देत चाकूने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. प्रसादने डाव्या हाताने बचाव केल्याने त्याच्या अंगठ्यावर खोल जखम झाली. तसेच कानामागील भागातही आरोपीने चाकूचा वार करून त्याला गंभीर जखमी केले.
जखमी प्रसादला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी मध्यरात्री उपविभागीय पो अधिक्षक विक्रांत गायकवाड, पोनि शिवाजी गायकवाड व पोसई साने यांनी भेट देऊन पंचनामा केला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोसई जाधव करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







