इचलकरंजीत अन्न व औषध प्रशासन कार्यालय सुरू करण्याची मागणी
इचलकरंजी :
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या औद्योगिक आणि व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात अन्न व औषध प्रशासन (FDA) कार्यालय सुरू करण्याची मागणी स्थानिक स्तरावर जोर धरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यापारी आघाडी प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नरहरी झिरवळ यांना निवेदन देऊन चर्चा केली.
निवेदनात इचलकरंजीची लोकसंख्या चार लाखांहून अधिक असून शहरात वस्त्रोद्योग, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या तसेच असंख्य लहान–मोठे उद्योग व व्यवसाय आहेत. शहरात सुमारे २,००० हून अधिक हॉटेल्स, खानावळी, ८०० मेडिकल स्टोअर्स, १४० अंगणवाड्या, १६० शाळा अशा विविध सुविधा असल्याने अन्न व औषध तपासणीची गरज मोठ्या प्रमाणात जाणवते.
सध्या कोणतीही तक्रार किंवा तपासणीची आवश्यकता भासल्यास कोल्हापूर येथील एकमेव कार्यालयावर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे वेळेत कारवाई होत नसल्याचेही नमूद करण्यात आले. नागरिकांना दर्जेदार धान्य, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू मिळाव्यात, तसेच बाजारपेठेतील व्यवसायांवर प्रशासनाचे वचक राहावे, यासाठी इचलकरंजीत स्वतंत्र अन्न औषध प्रशासन कार्यालय व प्रयोगशाळा स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना श्रीकांत कदम, हितेश खलपाडा व इचलकरंजीतील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







