विविध धार्मिक विधीपूर्वक छ संभाजीमहाराज पुतळा प्रतिष्ठापणा
इचलकरंजी
इचलकरंजीच्या मध्यवर्ती भागात उभारल्या जात असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासंबंधी गुरुवारी महत्त्वपूर्ण विधी पार पडले. साजणीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परिवार आणि श्री हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ समिती यांच्या २५ धारकऱ्यांनी सलग एका महिन्याच्या यात्रेनंतर महाराष्ट्रातील ५७ गडकिल्ल्यांवरील गोळा केलेली पवित्र माती स्मारकस्थळी आणून ती शंभू महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी अर्पण केली. या प्रक्रियेमुळे या स्मारकाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असा दुहेरी स्पर्श लाभला.
रायरेश्वर, राजगड, शिवनेरी, सिंहगड, विजयदुर्ग ते सिंधुदुर्ग अशा महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकोटांवरून आणलेली ही माती श्रद्धेचे प्रतीक मानली जात आहे. हा उपक्रम साजणीच्या धारकऱ्यांसाठी अभिमानाचा ठरला असून इचलकरंजीसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे मानले जात आहे.
यात्रेदरम्यान प्रयागराज येथून आणलेले गंगाजल आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांकडून अर्पण केलेली चांदीची पट्टी हे या संपूर्ण विधीचे विशेष आकर्षण ठरले.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा गुरुवारी क्रेनच्या सहाय्याने चबुतऱ्यावर प्रतिष्ठापित करण्यात आली. मूर्ती स्थापित झाल्यानंतर परिसरात घोषणांनी दणाणून गेला आणि आतषबाजी करण्यात आली. यापूर्वी चबुतऱ्याच्या ठिकाणाचा शांती विधी स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते पार पडला. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्यवाह प्रसाद जाधव, शेखर नाईक, मंगेश मस्कर आणि ॲड. समीर मुदगल यांची उपस्थिती होती.
यापुढील कार्यक्रमांमध्ये शुक्रवार ५ रोजी सकाळी ९.३० ते ११ या वेळेत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘श्वासात राजं, ध्यासात राजं’ हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच रविवार ७ रोजी दुपारी ५ वाजता एक हजार ढोल-ताशांच्या गजरात महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







