इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनतर्फे महावितरणला नोटीस
इचलकरंजी–
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार वीज नियामक आयोगाने दि. २८ मार्च २०२५ रोजी निश्चित केलेल्या दरानुसार वीज बिले देण्यात यावीत आणि जादा आकारलेल्या वीज बिलांचा परतावा द्यावा, अशी नोटीस इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनतर्फे अधिक्षक अभियंता (वीज दर) महावितरण प्रकाशगड मुंबई, मुख्य अभियंता महावितरण कोल्हापूर व कार्यकारी अभियंता इचलकरंजी यांना आज देण्यात आली.
यापूर्वी दि. २५ जून २०२५ रोजी जाहीर केलेला वीज दरवाढीचा आदेश मुंबई हायकोर्टाने रद्द केला होता. महावितरणने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा आदेश कायम ठेवत औद्योगिक संघटना, ग्राहक संघटना व संबंधित संस्थांना उपस्थित ठेवून १२ आठवड्यात जाहिर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. तोपर्यंत दि. २८/०३/२०२५ च्या दरानुसारच वीज आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, एप्रिल ते जून २०२५ ची बिले जुन्या दराने तर जुलै ते नोव्हेंबर २०२५ ची बिले वाढीव दराने आली होती. त्यामुळे एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ पर्यंतची जादा रक्कम ग्राहकांना परत केली जावी, अशी मागणीही नोटीसमध्ये करण्यात आली. अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
शिष्टमंडळात अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, सोमण्णा वाळकुंजे, पांडुरंग सोलगे, सुभाष बलवान, राजाराम गिरी तसेच कारखानदार प्रमोद महाजन, मिलिंद बिडकर आणि दीपक पाटील उपस्थित होते.
फोटो : इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनतर्फे कार्यकारी अभियंत्यांना नोटीस देताना शिष्टमंडळ.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




