लोकवर्गणीतून कुपनलिकेस बसवलेल्या मोटारी निविदेतून वगळण्याची मागणी
— शशांक बावचकर यांचे आयुक्तांना निवेदन
इचलकरंजी : शहरातील 207 विंधन विहिरींना विद्युत मोटर व अनुषंगिक साहित्य बसवण्याच्या कामास आमदार स्थानिक विकास निधीतून प्रशासकीय मान्यता मिळालेली असतानाही महानगरपालिकेच्या निविदांचा तांत्रिक लिफाफा अद्याप उघडलेला नाही. या विलंबाचा फायदा घेत काही प्रभागांतील इच्छुक उमेदवारांनी लोकवर्गणीतून विंधन विहिरींना मोटर बसवण्याची कामे पूर्ण केल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रभाग क्रमांक २० मधील भाग्यश्री कॉलनी कामगार कल्याण इमारतीजवळ व सम्राट अशोक नगर येथील दोन विंधन विहिरींवरील कामे पूर्ण झाल्याने ती कामे महानगरपालिकेच्या निविदेतून वगळावीत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व माजी नगरसेवक शशांक मल्हारराव बावचकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निविदा प्रक्रियेपूर्वी कामे पूर्ण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या अटींचे उल्लंघन होणार असून, ती कामे पुन्हा करून निधीची उधळपट्टी झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही बावचकर यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती आयुक्त, अति आयुक्त, पाणीपुरवठा विभाग व लेखा विभागाला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







