राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी पोतदार प्रथम, चैतन्य लाळगे द्वितीय तर श्रुती करणे तृतीय
इचलकरंजी:
महाविद्यालयीन स्तरावरील राज्याच्या विविध भागातून स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांनी स्व. श्री दगडूलाल मर्दा स्मृति राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत विविध विषयांवर आपल्या भाषणांच्या माध्यमातून परिणामकारक मांडणी केली. यामध्ये वैष्णवी रवींद्र पोतदार, शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर हिने प्रथम क्रमांक, चैतन्य चंद्रकांत लाळगे गव्हर्मेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सांगली याने द्वितीय क्रमांक तर श्रुती राजू कुरणे न्यू कॉलेज कोल्हापूर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील उत्तेजनार्थ क्रमांक शांभवी श्रीकांत माळकर पद्माराजे ज्युनिअर कॉलेज शिरोळ हिने तर भगवंत रामचंद्र कोळी, सांगोला महाविद्यालय सांगोला आणि वैभवी कुमार पाटील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे यांनी विशेष उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने १७व्या वर्षी सदरची वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, पुणे, नांदेड, सोलापूर इत्यादी भागातील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेच्या उदघाटन सत्रात येथील ज्येष्ठ रंगकर्मी व निवृत्त प्राध्यापक मिलिंद दांडेकर तसेच प्रा. विवेक कोकरे, प्रा. सादिक मुल्ला आणि जयश्री देसाई कोल्हापूर या परीक्षकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष घनश्याम सावलानी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना दांडेकर यांनी “अशा प्रकारच्या साहित्यिक व सांस्कृतिक स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असून त्यामधून ते सुसंस्कृत व्यक्ती म्हणून घडत जातात, त्यामुळे अशा स्पर्धा आवश्यक आहेत” असे उद्गार काढले. यावेळी इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी सौ. माधवी लाहोटी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मर्दा फौंडेशनचे विश्वस्त शामसुंदर मर्दा तसेच सर्व परीक्षक आणि पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना मर्दा यांनी “वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या विषयांवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर अधिक अधिकाधिक यश मिळविण्याचे ध्येय समोर ठेवावे आणि देशाच्या विकासात सहभागी व्हावे” असे विचार मांडले. याप्रसंगी सर्व परीक्षकांनी स्पर्धकांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. अमर कांबळे उपस्थित होते. उद्घाटन सत्रात परीक्षकांचा परिचय व सूत्र संचालन कपिल पिसे यांनी केले तर पारितोषिक वितरण समारंभात सूत्र संचालन संतोष आबाळे यांनी केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात सदरची स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेसाठी संयोजक संस्थांचे सदस्य, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते स्पर्धक आणि परीक्षक व पदाधिकारी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







