गणिताशी मैत्री, राष्ट्रनिर्मितीची तयारी
श्री नाकोडा हिंदी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना गणित दिनी श्री ए. आर. तांबे सरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
इचलकरंजी
श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित श्री नाकोडा हिंदी हायस्कूल हे केवळ अध्यापनाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे संस्कारपीठ असल्याचे राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गेली 42 वर्षे गणित विषयाचे अध्यापन करणारे, गणित विषयातील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे, संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे प्रमुख आदरणीय गुरुवर्य श्री ए. आर. तांबे सर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गणित दिन साजरा केला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री ए. आर. तांबे सर यांनी सर्वप्रथम गणित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी असलेली अनाठायी भीती दूर करण्याचे आवाहन करत त्यांनी, गणित हा भीतीचा नव्हे, तर विश्वासाचा विषय आहे. गणिताला मित्र बनवा,” असा आत्मविश्वास देणारा संदेश दिला.जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण कष्ट, अभ्यासातील सखोलता व नियमितपणा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की, “आपण सर्वजण भारताच्या शतकमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदार व या देशाचे जबाबदार नागरिक असणार आहात. देशाची प्रतिष्ठा आपल्या खांद्यावर असेल; म्हणून भारताला विश्वासाच्या सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी आजपासूनच प्रयत्नशील व्हा.”
ज्ञानप्राप्तीचे प्रतीक म्हणून श्री. ए. आर.तांबे सरांनी विद्यार्थ्यांना लेखणी भेट दिली. त्या लेखणीच्या माध्यमातून ज्ञानसंपादन करून स्वतःचे जीवन समृद्ध करू, उत्तम शैक्षणिक पात्रतेसह भारताचे सुजाण व जबाबदार नागरिक बनू, अशी ग्वाही श्री नाकोडा हिंदी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी “जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये” हा अर्थपूर्ण जीवनमंत्र देत श्री.तांबे सरांनी विद्यार्थ्यांच्या मनावर प्रेरणादायी ठसा उमटवला. तसेच श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक उपक्रमांना भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
गणित दिनाच्या आनंदात श्री ए. आर. तांबे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटून उत्सवाची गोड सांगता केली.
प्रथमत: विद्यादेवता सरस्वती मातेच्या साक्षीने, श्री नाकोडा हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री वि. ह. सपाटे सर यांच्या हस्ते श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने श्री ए. आर. तांबे सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रेरणादायी उपक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री वि. ह. सपाटे सर यांनी श्री ए. आर. तांबे सरांचे मनःपूर्वक आभार मानले.
मार्गदर्शन करताना ए आर तांबे सर,
उपस्थित विद्यार्थ्यांसह ए आर तांबे सर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





