इचलकरंजीत युवक, युवतींसाठी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय विविध स्पर्धा
इचलकरंजी –
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे युवक, युवती आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘युवास्पंदन’ हा राज्यस्तरीय विविध स्पर्धा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमात बुधवार दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता स्व-रचित मराठी काव्यवाचन स्पर्धा होईल तर गुरुवारी २२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता गीत गायन (कराओके) स्पर्धा होईल. तिसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक २३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता वैयक्तिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा होणार आहे. या सर्व स्पर्धा रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र, नाकोडा नगर, इचलकरंजी येथे होतील.
स्पर्धा उपक्रमात शनिवार दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पथनाट्य स्पर्धा होईल तर दुपारी ३ वाजता लघुनाटिका स्पर्धा होईल. उपक्रमाच्या समारोपाच्या पाचव्या दिवशी रविवार दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता वैयक्तिक नृत्य स्पर्धा होईल तर सायंकाळी ५ वाजता समुह नृत्य स्पर्धा होईल. या स्पर्धा येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार आहेत.
वैयक्तिक स्पर्धांसाठी प्रथम क्रमांक ३००० रुपये, द्वितीय २००० रुपये आणि तृतीय १००० रुपये अशी रोख बक्षिसे व सन्मानचिन्हे आहेत. सांघिक स्पर्धांसाठी प्रथम क्रमांक ७००० रुपये, द्वितीय ५००० रुपये आणि तृतीय ३००० रुपये अशी रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. आवश्यक वाटल्यास उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
सदरच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील तसेच गोवा आणि बेळगाव भागातील १६ ते ३० वयोगटातील युवा कलाकार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. इच्छुकांनी यासाठी अध्यक्ष, मनोरंजन मंडळ, दाते मळा, सुंदर बागेजवळ, इचलकरंजी ४१६११५ या पत्त्यावर १८ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने समीर गोवंडे, श्यामसुंदर मर्दा आणि घनशाम सावलानी यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







