इचलकरंजीत भगवं वादळ
रविंद्र माने यांच्यासह सहकाऱ्यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल
इचलकरंजी :
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी सोमवार दि.29 रोजी शिवसेना, भाजप महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख रविंद्र माने, सौ.श्वेता मालवणकर यांनी, तर भाजपच्यावतीने युवा नेते राहुल घाट, सौ.रुपा बुगड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासकरुन लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.
महायुतीमध्ये शिवसेनेला किती जागा मिळणार याबाबत मतभिन्नता व्यक्त होत होती. परंतू शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे शिवसेनेला 11 जागा मिळाल्या आणि रविवारी मध्यरात्रीनंतर यावर शिक्कामोर्तब झाले. सोमवारी सकाळी 10 वाजता जुना सांगली वेस मारुती मंदिर येथे रविंद्र माने यांच्यासह सहकाऱ्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी झाली. मारुती मंदिरात महाआरती झाल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली गणपती हौद, अवधूत आखाडा, त्रिशुळ चौक, महाराणाप्रताप चौक, महादेव मंदिर मार्गे मातोश्री भवन येथे आली. यावेळी लाडक्या भगिनींनी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्यासह उमेदवारांचे औक्षण केले. यानंतर ही रॅली झेंडा चौक, राजवाडा चौक मार्गे, सत्र न्यायालयासमोरील आली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी पुतळा मार्गे जुनी नगरपालिका येथील निवडणूक विभागीय कार्यालयासमोर रॅलीची सांगता झाली.
त्यानंतर प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेच्यावतीने रविंद्र माने, सौ.श्वेता मालवणकर, भाजपच्यावतीने युवा नेते राहुल घाट, सौ.रुपा बुगड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा सिंघन यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हातकणंगलेचे नूतन नगराध्यक्ष अजितसिंह पाटील काका यांच्यासह हातकणंगलेचे नुतन नगरसेवक, पुंडलिकराव जाधव, उदय बुगड, मोहन मालवणकर यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
पहिला महापौर महायुतीचाच असेल…
इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवत आहोत. समाधानकारक जागावाटप झालेले आहे. एकदिलाने निवडणूक प्रचार आणि मतदान होईल, यात तिळमात्र शंका नाही. खा.धैर्यशील माने, आ.डॉ.राहुल आवाडे, माजी आ.सुरेशराव हाळवणकर, माजी आ.प्रकाश आवाडे, माजी आ.अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने आम्ही बहुमत मिळवू आणि पहिला महापौर हा महायुतीचाच होईल, असा मला ठाम विश्वास आहे.
– रविंद्र माने, शिवसेना जिल्हाप्रमुख
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







