निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोमांस तस्करी वाढल्याचा आरोप; कठोर कारवाईची विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाची मागणी
इचलकरंजी:
निवडणुकीच्या काळात शहर परिसरात वाढत्या गोमांस तस्करीच्या घटनांविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, इचलकरंजी जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस उपाधीक्षकांना देण्यात आले.
संस्थेच्या माहितीनुसार, 04 जानेवारी 2026 रोजी शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे कार्यकर्त्यांनी एका कथित गोमांस तस्करीचा प्रकार उघड केला. या प्रकरणी शिरोळ पोलिस ठाण्यात FIR क्र. 0001/2026 अन्वये तक्रार नोंदविण्यात आली आहे. संबंधित प्रकार हा बेकायदेशीर असून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा आणि कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप संस्थेकडून करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारचे गुन्हे सतत घडत असल्याने समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे आणि कायदा–सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या संवेदनशील कालावधीत अशा घटना सामाजिक सलोखा बिघडवू शकतात व धार्मिक तणावाला खतपाणी घालू शकतात, असेही नमूद करण्यात आले.
संस्थेने पोलिस प्रशासनाला संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच या गुन्ह्यांमागील संपूर्ण साखळीचा (रॅकेटचा) तपास करण्याची मागणी केली आहे. तसेच पुढील काळात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







