ICHMH51NEWS.IN
9921600800

उमेदवारी कापून तिकीट विकल्याचा आरोप; शिवसेना युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे आक्रमक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारी कापून तिकीट विकल्याचा आरोप; शिवसेना युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे आक्रमक

इचलकरंजी:
 शिवसेना (शिंदे गट) युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे यांनी उमेदवारी कापून तिकीट विक्री केल्याचा गंभीर आरोप जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्यावर केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात कार्यरत असून २०२२ पासून निवडणुकीची तयारी करत असतानाही, शेवटच्या टप्प्यात अन्य व्यक्तींना तिकीट देण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
सलोनी शिंत्रे म्हणाल्या की, गेल्या महिन्यापासून जिल्हाप्रमुख त्यांच्याशी संवाद टाळत होते. भाजपमधून प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पैसे घेऊन तिकीट देण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “इचलकरंजीतील मूळ शिवसैनिकांवर अन्याय होत आहे. शिवसेना कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असून पक्ष संघटनेला यामुळे मोठा फटका बसणार आहे,” असेही त्या म्हणाल्या.
पक्षातील उमेदवारी वाटपावर टीका करताना शिंत्रे यांनी सांगितले की, लढवण्यात आलेल्या ११ जागांपैकी केवळ ३ जागा मूळ शिवसैनिकांना देण्यात आल्या असून उर्वरित ठिकाणी आयात उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. काही प्रभागांत “मैत्रीपूर्ण लढत” घडवून आणून पक्षाचे नुकसान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “स्वतः नगरसेवकपद मिळवण्यासाठी भाजपसोबत तडजोड करून त्यांच्या उमेदवारांना शिवसेनेच्या चिन्हावर उभे करण्यात आले,” असा दावा सलोनी शिंत्रे यांनी केला.

‘खासदारही हतबल’

शिंत्रे यांनी पुढे सांगितले की, वरिष्ठ पातळीवर जागा मंजूर करून स्वतःची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. तथापि, स्थानिक पातळीवरील मनमानीमुळे निर्णय बदलला गेला. “संपूर्ण प्रकरणात खासदारही हतबल झाले आहेत आणि जिल्हाप्रमुखांच्या निर्णयांमुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा