बुद्धिबळातील महाराष्ट्राच्या लेकींचा ऐतिहासिक पराक्रम.६९ व्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेता,प्रशिक्षक रोहित पोळ यांचे उल्लेखनीय योगदान.
व्हिडीओ-https://youtube.com/shorts/WCGHBGZFBlY?si=SldIwdtpqOmqldqi
इचलकरंजी
झारखंड राज्यातील रांची येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित ६९ व्या राष्ट्रीय शालेय अंडर-१४ मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत (२०२५–२६) महाराष्ट्राच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावले. केवळ सामने जिंकूनच नव्हे, तर संयम, आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर महाराष्ट्राच्या लेकींनी देशासमोर आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक मिळवत राज्याचा मान उंचावला. हे यश केवळ पदकापुरते मर्यादित नसून संघभावना, शिस्त आणि सातत्यपूर्ण संघर्षातून घडलेली यशोगाथा असल्याचे क्रीडाविश्वात गौरवले जात आहे.
महाराष्ट्र संघाची कर्णधार कु. घाटे तन्मयी (सातारा) हिने संघाला प्रभावी नेतृत्व दिले. संघातील कु. परदेशी चतुर्थी (पुणे), कु. प्रणिता भावा (मुंबई), कु. गांधी परिधी (अमरावती) आणि कु. सानवी दत्तात्रय गोरे (बार्शी) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विशेषतः कु. सानवी गोरे हिने ५व्या बोर्डवर प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक (बोर्ड पुरस्कार) मिळवला आणि मेहनत, धैर्य व विश्वास यांचा मेळ यश देतो हे सिद्ध केले.
या यशामागे मुलींच्या संघाचे प्रशिक्षक श्री. रोहित महादेव पोळ (इचलकरंजी–कोल्हापूर), संघ व्यवस्थापक वैष्णवी मॅडम तसेच संपूर्ण मार्गदर्शक टीमचे योग्य नियोजन व पाठबळ महत्त्वाचे ठरले. पालकांचा संयम, प्रशिक्षकांची सातत्यपूर्ण मेहनत, जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर आणि महाराष्ट्र राज्याचे प्रोत्साहन या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे हे यश असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
विशेष म्हणजे, २०२३–२४ मध्ये तामिळनाडू येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय अंडर-१४ मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेतही महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक रोहित पोळ हेच होते आणि त्यावेळीही महाराष्ट्राने उपविजेतेपद मिळवले होते. सध्या ते केन चेस अकादमी, इचलकरंजी चे मुख्य प्रशिक्षक असून महाराष्ट्राच्या बुद्धिबळ क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जात आहे.
महाराष्ट्राच्या या बुद्धिबळपटूंनी मिळवलेले यश राज्यासाठी अभिमानास्पद ठरत असून भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरही या लेकी आपली छाप पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपविजेता महाराष्ट्र संघ चषक स्वीकारताना
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







