पी.एम. स्वनिधी योजनेतून इचलकरंजीतील पथविक्रेत्यांना कर्ज वितरणाचा लाभ.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका अंतर्गत पथविक्रेत्यांना प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पी.एम. स्वनिधी) योजनेतून व्यवसायासाठी कर्ज वितरण करण्यात आले. कार्यक्रमात आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे व समाज विकास अधिकारी बेबी नदाफ यांच्या शुभहस्ते पथविक्रेत्यांना कर्जाचे वितरण करण्यात आले.
शासनाकडून इचलकरंजी महापालिकेस ५७४७ पथविक्रेत्यांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील ७०२६ पथविक्रेत्यांना रुपये १०,००० चे प्रथम टप्प्यातील कर्ज वितरित केले आहे. तसेच २७८० पथविक्रेत्यांना रुपये २०,००० चे द्वितीय टप्प्यातील, तर ५६७ पथविक्रेत्यांना रुपये ५०,००० चे तृतीय टप्प्यातील कर्ज वितरित करण्यात आले आहे.
ही योजना ऑक्टोबर २०२५ पासून पुन्हा सुरू झाली असून यामध्ये प्रथम टप्प्यात रुपये १५,०००, द्वितीय टप्प्यात रुपये २५,००० आणि तृतीय टप्प्यात रुपये ५०,००० इतके कर्ज उपलब्ध होणार आहे. महापालिका क्षेत्रातील पात्र पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या कार्यक्रमास बँक ऑफ बडोदा बँकेचे व्यवस्थापक अविनाश मुळीक, शहर अभियान व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे, समुदाय संघटक सन्मिता निंबाळकर व सुरेश कांबळे उपस्थित होते.
पथविक्रेत्याना कर्ज वितरण करताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









