नूतन नगरसेवक राजू पुजारी यांच्याकडून प्रशासनाची फसवणूक – रविंद्र लोहार यांचा आरोप
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या सन २०२५–२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. १५ (अ) मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेवरून निवडून आलेले नूतन नगरसेवक श्री. राजू आप्पासो पुजारी यांनी खोटे जात प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाची फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप रविंद्र गणपती लोहार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना रविंद्र लोहार यांनी सांगितले की, निवडणूक अर्ज दाखल करताना श्री. राजू आप्पासो पुजारी यांनी आपण धनगर समाजातील असून नागरिकांचा मागास प्रवर्गातून येत असल्याचे दाखविले आहे. त्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी यांनी दि. २६ ऑक्टोबर २०१० रोजी दिलेले अ.क्र. ४१२१/२०१० क्रमांकाचे जात प्रमाणपत्र सादर केले आहे. हे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी कथितपणे वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला सादर करून धनगर-२९ या जातीचा दाखला प्राप्त केला असल्याचा आरोप करण्यात आला.
लोहार पुढे म्हणाले की, श्री. राजू आप्पासो पुजारी हे मूळचे कर्नाटक राज्यातील रहिवासी असून कर्नाटक-एकसंबा येथे त्यांची वडिलोपार्जित जमीन व घर आहे. तसेच ते कर्नाटक राज्यातील नोंदणीकृत अधिकृत मतदार आहेत. असे असताना महाराष्ट्र राज्यातील घोसरवाड येथील वडिलांच्या नावात साधर्म्य असलेल्या, मात्र रक्तसंबंध नसलेल्या व्यक्तीचा शाळा सोडल्याचा दाखला अनधिकृत व बेकायदेशीररीत्या वापरून जात प्रमाणपत्र मिळवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
श्री. पुजारी यांनी जाणूनबुजून खोटी माहिती व चुकीची कागदपत्रे सादर करून शासन यंत्रणेची दिशाभूल केली असून आरक्षण व जात प्रमाणपत्र व्यवस्थेचा गैरवापर केल्याचे लोहार यांनी सांगितले. हे कृत्य पूर्वनियोजित असून शासन व समाजाची फसवणूक करणारे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच यामागे कोणती बोगस जात प्रमाणपत्र देणारी टोळी कार्यरत आहे का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी रविंद्र लोहार यांनी जात पडताळणी समिती, कोल्हापूर विभाग, शिवाजीनगर पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्हा तसेच उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी यांच्याकडे केली आहे.
सदर पत्रकार परिषदेस रविंद्र गणपती लोहार, श्रीरंग लोहार व पुंडलिक जाधव उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







