इमनपा महापौर–उपमहापौरपदासाठी महायुतीतर्फे उदय धातुंडे व अनिल डाळ्या यांना उमेदवारी
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेतील भाजप–महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांची महत्वपूर्ण बैठक इचलकरंजी येथे यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्यासह भाजप–महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी श्री. उदय धातुंडे व उपमहापौरपदी श्री. अनिल डाळ्या यांची नावे घोषित करण्यात आली, प्रदेश पातळीवर नावे पाठवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार नावे निश्चित करण्यात आली.
यानंतर भाजप–महायुतीचे महापौरपदाचे उमेदवार उदय धातुंडे व उपमहापौरपदाचे उमेदवार अनिल डाळ्या यांनी महानगरपालिकेत अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. हा अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
बैठकीनंतर बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले की, “आवाडे–हाळवणकर गटात कोणतेही तट नाहीत. इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न हा आमचा प्राधान्याचा विषय असून तो सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील.” तसेच त्यांनी महाविकास आघाडीला आवाहन करत, “अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी निवडणूक बिनविरोध करावी,” असे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले, “शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सत्तेत सहभागी करून घेण्याची आमची भूमिका आहे. रविंद्र माने हे नातेवाईकही असल्याने त्यांना योग्य ती जबाबदारी देणे क्रमप्राप्त आहे.”
महाविकास आघाडी नाराजांच्या जोरावर काही चमत्कार करेल का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सभागृहात कोणतीही बंडखोरी होणार नाही. सभागृहात वेळेत उपस्थित न राहणाऱ्या सदस्यांना थेट अपात्र ठरवण्याचा कायदा असून ते अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, सौ. मोश्मी आवाडे, राहुल चिकोडे, सुनील पाटील, शेखर शहा, प्रकाश दत्तवाडे, रविंद्र माने, श्रीरंग खवरे, शशिकांत मोहिते, विठ्ठल चोपडे,दिलीप मुथा,राजू भाकरे महिला आघाडीच्या अध्यक्षा तसेच मोठ्या संख्येने नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
आ.राहुल आवाडे समर्थक पाच पांडव नाराज.
आ.राहुल आवाडे समर्थक पाच पांडव अशी ओळख असलेले राजु बोंद्रे, सतीश मुळीक महापौर निवडीवरून नाराज असून नितेश पोवार यांच्या नावाचा आग्रह त्यांनी धरला होता मात्र उदय धातूंडे यांचे नाव निश्चित झाल्याची कुणकुण लागताच त्यांनी आ.राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याकडे संपर्क केला असता योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बैठकीस अनुपस्थिती लावली.
महापौर पदासाठी उदय धातूंडे यांचे नाव घोषित करण्यात आले त्यावेळी ना.चंद्रकांत दादा पाटील,आ.राहुल आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, उदय धातूंडे व इतर
महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करताना उदय धातूंडे,अनिल डाळ्या सोबत आ.राहुल आवाडे,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








