इचलकरंजीत संत निरंकारी मंडळाचा ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत स्वच्छता उपक्रम
इचलकरंजी :
मानवसेवा व लोककल्याणाच्या उदात्त भावनेतून संत निरंकारी मिशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाचा चौथा टप्पा रविवारी (दि. २२) सकाळी ८ ते ११ या वेळेत देशभर एकाच वेळी पार पडला. परम श्रद्धेय माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी व झरे यांसारख्या जलस्रोतांची स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती व प्रत्यक्ष श्रमदानाच्या माध्यमातून समाजाला प्रेरित करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येतो. बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणीवर आधारित हा प्रकल्प २०२३ साली भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू करण्यात आला होता. आतापर्यंतच्या तीन टप्प्यांत सेवा, समर्पण आणि सामूहिक सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण देशभर निर्माण झाले आहे. यंदाचा उपक्रम देशातील १५०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी पार पडला.
या पार्श्वभूमीवर इचलकरंजी ब्रांचच्या वतीने पंचगंगा नदी घाट परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अल्पावधीतच माता-भगिनी, महापुरुष, लहान बालके तसेच सेवादल सदस्यांनी उत्साहाने श्रमदान करून संपूर्ण घाट परिसर स्वच्छ केला. वाढते प्रदूषण आणि जलस्रोतांवर वाढणारा ताण लक्षात घेता त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या मोहिमेसाठी इचलकरंजी ब्रांचचे मुखी महात्मा दत्तात्रय गोरेजी तसेच संचालक सेवादल विलास लाडजी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इचलकरंजी नागरी मंचचे अध्यक्ष अभिजीत पटवा, उपयुक्त विद्या कदम मॅडम आणि आरोग्य अधिकारी दूरकर साहेब यांचेही सहकार्य लाभले.
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाबरोबरच अंतःकरण शुद्धीचा संदेश देत संत निरंकारी मिशनने सामाजिक बांधिलकीची प्रचीती पुन्हा एकदा घडवून आणली.
स्वच्छता अभियानात सहभागी संत निरांकरी मंडळाचे सदस्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






