इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा
इचलकरंजी :
नियोजित हातकणंगले–इचलकरंजी रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी या मागणीसाठी सोमवारी इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्था तसेच रेल्वेप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रेल्वे कृती समितीच्या पुढील सर्व आंदोलनांना व चळवळींना सक्रिय सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय उदासीनता आणि निधीअभावी हातकणंगले–इचलकरंजी हा सुमारे आठ किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे कृती समितीने खासदार, आमदार तसेच शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन हाती घेण्यात आल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक ‘राष्ट्रगीत’चे संपादक अजय जाधव (आबा) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव मदन कारंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेवक सुशांत कलागते, बाळासाहेब कलागते, अभिषेक वाळवेकर, अमृतमामा भोसले, राजू पुजारी, संतोष सावंत, रणजीत अनुसे, प्रमोद बचाटे, उमाकांत दाभोळे, नंदकुमार पाटील, सचिन राणे, प्रदीप धुत्रे, सुकुमार पाटील, पुंडलिकराव जाधव, अभिजित पटवा, मनीष आपटे, के. के. कांबळे, अभिजित रवंदे, डॉ. अमित शर्मा, पंकज त्रिपाठी यांच्यासह ब्राह्मण युवा मंच, वकील संघटना, मराठा महासंघ, इचलकरंजी नागरी मंच तसेच व्यापारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यासपीठावर रेल्वे कृती समितीने यापूर्वी केलेल्या पाठपुराव्याचे फोटो व माहितीफलक लावण्यात आले होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे समितीच्या सदस्यांनी स्वागत केले.
हातकणंगले–इचलकरंजी रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
धरणे आंदोलनात सहभागी मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




