कबनुरमधील आक्षेपार्ह झेंडा काढण्याचा सर्वमान्य निर्णय; ठिय्या आंदोलन मागे
इचलकरंजी :
हातकणंगले तालुक्यातील कबनुर येथे लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह झेंड्याच्या प्रकरणी अखेर सर्वमान्य तोडगा निघाला असून संबंधित झेंडा सन्मानपूर्वक काढून तो धार्मिकस्थळी लावण्यात यावा, असा एकमुखी निर्णय प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर शिवाजीनगर पोलीस ठाणे समोर बुधवार सकाळपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन सायंकाळी मागे घेण्यात आले.
कबनुर येथे महापुरुषांबाबत अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी जमावाकडून दुकानांवर दगडफेक करण्यात आली होती. तसेच मुख्य चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मुख्य चौकात लावण्यात आलेला आक्षेपार्ह झेंडा काढण्याची मागणी एका गटाकडून जोर धरत होती. या प्रकरणात पोलिसांवर दगडफेक झाल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 53 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून गावात तणावाचे वातावरण होते.
बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले. झेंडा तत्काळ काढण्यात यावा, दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अटकेची कारवाई थांबवावी तसेच संबंधित महिलेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांची समजूत काढली व योग्य कारवाईचे आश्वासन दिले. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
दरम्यान, कबनुर ग्रामपंचायतीत दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींच्या दोन बैठका झाल्या; मात्र त्यातून तोडगा निघाला नाही. अखेरीस सायंकाळी प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही समाजांचे प्रमुख प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस व महसूल अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
प्रांताधिकाऱ्यांनी सर्व बाजू स्वतंत्रपणे ऐकून घेतल्यानंतर कबनुरमधील आक्षेपार्ह झेंडा सन्मानाने काढून संबंधितांनी आक्षेपार्ह मजकूर नसलेला झेंडा धार्मिकस्थळी लावण्याचा निर्णय जाहीर केला. अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी भविष्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य होऊ नये, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.
बैठकीस पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, तानाजी सावंत, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सुशांत चव्हाण, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक गजेंद्र लोहार, जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह महसूल, पोलीस व संबंधित विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि दोन्ही समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करताना हिंदुत्ववादी कार्यकर्ते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







