दोघेही निसर्ग अस्सल अनुभूतीचे लेखन करणारे लेखक-डॉ. रफिक सूरज यांचे प्रतिपादन
इचलकरंजी:
स्वातंत्र्यानंतरचा काळ हा ग्रामीण साहित्याच्या दृष्टीने प्रयोगशीलतेचा आणि संक्रमणाचा काळ होता.या काळामध्ये ग्रामीण साहित्य हळूहळू रंजन परंपरेतून मुक्त होत गेले.ग्रामीण वास्तवाच्या प्रगटीकरणाला महत्त्व येऊ लागले. ग्रामीण साहित्य अधिक जीवनसन्मुख करण्यासाठी अनेक लेखकांनी प्रयत्न केले. त्यापैकी शंकर बाबाजी पाटील आणि शंकर खंडू पाटील हे दोन महत्त्वाचे लेखक होते. त्यांनी निसर्ग हे मुख्य पात्र मानून अस्सल अनुभूतीचे लेखन केले.तसेच श्रोत्यांना मनमुराद हसवणारे कथाकथनही केले. बदलत्या मराठी ग्रामीण कथेचे हे दोघे शिल्पकार होते,असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.रफिक सुरज यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने कविवर्य वि.वा.शिरवाडकर जन्मदिन अर्थात मराठी भाषा गौरव दिन आणि शंकर बाबाजी पाटील व शंकर खंडू पाटील या थोर साहित्यिकांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात “ग्रामीण कथेचे दोन शिल्पकार “या विषयावर बोलत होते. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.जयकुमार कोले यांनी पाहुण्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले.डॉ.एफ.एम. पटेल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी अन्वर पटेल यांनी तयार केलेल्या साहित्यिक शंकर बाबाजी पाटील यांच्या जीवन कार्याची ओळख करून देणाऱ्या चित्ररूप परिचय मालिकेचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या उत्तम चित्रमालिकेबद्दल त्यांचा डॉ. रफिक सूरज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ.रफिक सूरज पुढे म्हणाले,शंकर बाबाजी पाटील हे मानवी मनाचे दर्शन घडवणारे कथालेखक होते.तर शंकर खंडू पाटील यांनी ग्रामीण जगण्यातील कन्हणे आणि विनोदी किस्से आपल्या लेखनातून मांडले. या दोघांचेही लेखन हे मातीशी जोडलेले होते. घटना प्रधानता, जखडून ठेवणारा आशय , गोळीबंद आणि बांधेसूद लेखन, खट्याळपणा ही सारी वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात होती. त्यांच्या साहित्यावर अनेक चित्रपट निघाले.अनेक चित्रपटांचे पटकथा लेखन ,संवादलेखन त्यांनी केले.ते गाजलेले चित्रपट ठरले. या दोन्ही लेखकांच्या जीवनाच्या व साहित्यकृतींचा त्यातील वैशिष्ट्यांचा अतिशय सविस्तर आढावा डॉ.रफिक सूरज यांनी आपल्या शैलीदार भाषणात घेतला. या कार्यक्रमास बंडोपंत फडणीस ,सुजित सौंदत्तीकर, अशोक केसरकर ,प्रल्हाद मेटे, राजन मुठाणे, बजरंग लोणारी,भरमा कांबळे, पांडुरंग पिसे,महेंद्र जाधव, प्रा.राकेश शेटके, वैशाली नायकवडी,दयानंद लिपारे, रामभाऊ ठिकणे, रिटा रॉड्रिक्स, उज्वला जाधव, अजित मिणेकर, धुळगोंडा पाटील, शकील मुल्ला , बाबासाहेब कदम, जतीन पोतदार, शिवाजी शिंदे, के. एम. पाटील, विनोद जाधव , शिवाजी शिंदे यांच्यासह
साहित्य रसिकांच्या मोठा प्रतिसाद मिळाला. सचिन पाटोळे यांनी आभार मानले.
मनोगत व्यक्त करताना डॉ.रफिक सूरज
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








