राष्ट्रीय लोकअदालतीत १६६ प्रकरणे निकाली; ४.४३ कोटींची वसुली
इचलकरंजी:
जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे शनिवारी (१४ मार्च) राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात पार पडली. या लोकअदालतीत दाखलपूर्व व न्यायालयात प्रलंबित अशी एकूण १६६ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून त्यातून ४ कोटी ४३ लाख ७३ हजार ९५३ रुपयांची वसुली करण्यात आली.
ही राष्ट्रीय लोकअदालत माननीय श्री. जे. एल. गांधी, अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश-१, इचलकरंजी आणि माननीय श्री. एम. ए. भोसले, जिल्हा न्यायाधीश-२, इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
लोकअदालतीसाठी वीज वितरण कंपनी, बँका व विविध वित्तीय संस्थांची दाखलपूर्व १५८८ प्रकरणे आणि न्यायालयातील २६२३ प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व १५ आणि न्यायालयातील १५१ प्रकरणे अशी एकूण १६६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या लोकअदालतीसाठी एकूण सहा पॅनेल तयार करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख म्हणून माननीय श्री. जे. एल. गांधी (जिल्हा न्यायाधीश-१), माननीय श्री. एम. ए. भोसले (जिल्हा न्यायाधीश-२), माननीय कुमारी आर. डी. खराटे (सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर), डॉ. डी. बी. साठे (दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर), श्री. ए. आर. कुलकर्णी (चौथे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर) आणि कुमारी एम. एस. गावडे (पाचवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर) यांनी काम पाहिले.
न्यायालयातील पॅनेल सदस्य म्हणून विधीज्ञ सुशांत नुले-पाटील, रागिनी मोरबाळे, निता परीट, पूजा जाधव, रोहन मराठे आणि ऋतिका भन्साळी यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, संजय घोडावत विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हेगारी विषयावर पथनाट्य सादर करून उपस्थितांना जनजागृती केली. महिलांची ऑनलाइन फसवणूक व आर्थिक फसवणूक यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यात आली.
लोकअदालत यशस्वी करण्यासाठी इचलकरंजी न्यायालयातील सर्व न्यायाधीश, इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष राजगोपाल तोष्णीवाल, उपाध्यक्ष राजाराम सुतार, सचिव अभिजीत माने, सहसचिव आदित्य मुदगल, खजिनदार विजय शिंगारे, तसेच सदस्य, नोटरी संघटना, विविध विधी महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी, हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
लोकअदालती वेळी घेतलेले छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




