इचलकरंजीत भगवान महावीरांचा २६२५ वा जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
इचलकरंजी :
जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२५ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त इचलकरंजीत भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जगा आणि जगू द्या’ असा अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर जयंतीनिमित्त भ. महावीर जयंती उत्सव मंडळ व सकल जैन समाजाच्या वतीने हा सर्वपंथीय महोत्सव साजरा होत असून याला ५१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे.
महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा, सेवाकार्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ मार्च रोजी वीर सेवा दलाच्या वतीने रक्तदान शिबिर, २५ मार्च रोजी ‘चलो बनेंगे धर्मज्ञानी’ प्रश्नमंजुषा स्पर्धा, २६ मार्च रोजी पाककला स्पर्धा व रक्तदान शिबिर, २७ मार्च रोजी अष्टद्रव्य थाळी सजावट स्पर्धा, २८ मार्च रोजी जैन भजन स्पर्धा तर २९ मार्च रोजी ट्रेझर हंट, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू व पारंपरिक उत्सव आरास स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी सायंकाळी भव्य भजन संध्या आयोजित केली आहे.
मुख्य महोत्सव सोमवार दि. ३० मार्च रोजी साजरा होणार असून प्रभात फेरी, ध्वजारोहण, रक्तदान शिबिरे, अन्नदान, मिष्ठान्न वाटप यांसारख्या सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी श्री आदिनाथ मंदिर येथून चित्ररथ शोभायात्रा व भगवान महावीर रथोत्सव काढण्यात येणार असून नामदेव भवन मैदान येथे बक्षीस वितरण व सत्कार समारंभ होणार आहे. शेवटी प्रभावना प्रसादाने महोत्सवाची सांगता होईल.
या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सचिव उदय चौगुले यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय मगदुम, विजय गिरमल, शीतल पाटील, अशोक मगदुम, मोहन उपाध्ये, मोहन चौगुले, अनिल बमन्नावर, कुंतीलाल पाटणी, सुरेश रोजे, शशिकला बोहरा, भीमगोंडा पाटील व सुकुमार पोते यांचे योगदान आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







