इंदोर धर्तीवर स्वच्छता नियोजनासाठी विशेष सभा बोलवा-अँड अलका स्वामी
इचलकरंजी : इंदोरच्या धर्तीवर शहरात सक्षम व आधुनिक स्वच्छता व्यवस्थेची उभारणी करण्यासाठी विशेष सभा आयोजित करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान महापालिका नगरसेविका अँड सौ. अलका स्वामी यांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत केली.
इंदोर महानगरपालिका देशातील स्वच्छतेच्या बाबतीत अग्रस्थानी असून Swachh Bharat Mission अंतर्गत सातत्याने प्रथम क्रमांक पटकावणारी आदर्श महापालिका म्हणून ओळखली जाते. या पार्श्वभूमीवर स्वच्छता व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी आयोजित दौऱ्यातून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग आपल्या शहरात प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
अभ्यास दौऱ्यादरम्यान इंदोर महानगरपालिकेला भेट देण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त, नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. या भेटीत कचरा व्यवस्थापनाची कार्यक्षम पद्धत, घराघरातून कचरा संकलन (डोअर-टू-डोअर कलेक्शन), ओला व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यावर प्रक्रिया करणारी अत्याधुनिक यंत्रणा तसेच नागरिकांच्या सक्रिय सहभागातून उभारलेली प्रभावी स्वच्छता प्रणाली याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.
इंदोर महानगरपालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे शहर स्वच्छ, सुंदर व सुस्थितीत राहिले असून, नागरिकांचा सक्रिय सहभाग, तंत्रज्ञानाचा वापर, स्त्रोतावरच कचरा वर्गीकरण आणि नियमित देखरेख यामुळे इंदोरने स्वच्छतेत सातत्य राखले आहे. या यशस्वी मॉडेलचा अवलंब आपल्या शहरात केल्यास स्वच्छ, निरोगी आणि सुंदर शहर उभारणे शक्य होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





