इचलकरंजी महागरपालिकेचे ८५८.१९ कोटींचे व शिलकी ३२ लाखाचे अंदाजपत्रक मंजूर,सत्ताधाऱ्यांत समन्वयाचा अभाव तर विरोधक समतोल.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेचे ८५८.१९ कोटींचे व ३२ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक आज झालेल्या सभेत मंजूर करण्यात आले.आयुक्त व अति आयुक्त लेखाधिकारी यांनी अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केल्यानंतर स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी अंदाजपत्रक महापौर उदय धातूंडे यांच्याकडे सादर केले.
अंदाजपत्रक चर्चेदरम्यान यामध्ये सत्ताधारी गटात समन्वयाचा अभाव दिसून आला तर विरोधी गटाने समांतर भूमिका बजावत सूचना मांडल्या,या सर्वांचा विचार करत शेवटी महिला बालकल्याण समितीस ९ कोटी २९ लाख रुपये,परिवहन समितीस १५कोटी १० लाख रुपये,शिक्षण समितीस १४ कोटी ३५ लाख रुपये, समाज कल्याण समितीसाठी १ कोटी ३७ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली.महापौर,उपमहापौर,सभागृह नेता व विरोधीपक्ष नेता यांना प्रत्येकी ५० लाख रुपये स्वेच्छा निधी तर प्रत्येक नगरसेवकास ७.५० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून यामधून तातडीची लहान लहान कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सर्वच सदस्यांनी चांगले अंदाजपत्रक मांडल्याबद्दल प्रशासनाचे व स्थायी समितीचे अभिनंदन केले.
सुरवातीला बोलताना तानाजी पोवार यांनी ज्या मिळकतधारकांनी घरफाळा लागू केला नाही त्यांना शोधून घरफाळा लागू करण्याचे तसेच बेकायदेशीर पाणी कानेक्शनबाबत तपासणी करून ते नियमित करून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सुचवले,मोठ्या घरफाळा थकबाकीदाराच्या कारवाया सुरू असून त्याबाबत निर्णय घेण्याचे सांगताना गुंठेवारी प्रक्रिया जलद करणे,लिलाव होत नसलेल्या गाळ्याचे भाडे डिपॉजिट कमी करून देणे,आंबेडकर पुतळा,गांधी पुतळा सुशोभित करणे,परिवहन समितीस जादा निधी देणे,म्युन्सिपल बॉण्ड निर्माण करणे,आवश्यकता भासल्यास कर्ज काढणे अशा सुधारणा सुचवल्या.
सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी उत्पन्नाचे विविध मार्ग सुचवत मुद्रांक शुल्क,सेफ्टीक टॅंक,भुई भाडे ,खत निर्मिती यामध्ये सुधारणा सुचवल्या तर शॉपिंग सेंटर इमारतीचे भाडे वार्षिक १९ लाख रुपये येत असून ती इमारत जुनी झाल्याने नविन भव्य शॉपिंग मॉल उभा करून उत्पन्न वाढ सुचवली,थोरात चौक येथे सुविधा देण्याचे सुचवले तर ऑफिस टेलिफोन बिल,सुरक्षारक्षक खर्च,घनकचरा खर्च,वाहनचालक खर्च यामध्ये कपात सुचवली.
मदन कारंडे यांनी संयुक्त करावरील सवलतीचा विचार करावा,इंदोर दौऱ्याचा सदुपयोग व्हावा,काळा ओढा उगमपासूम स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी तरतूद,ओपन स्पेस मध्ये पार्किंग झोन करावे असे मत मांडले.
उदयसिंग पाटील यांनी मंगल कार्यालय व सांस्कृतिक भवन मधील उत्पन्नाची तफावत निदर्शनास आणत,शॉपिंग सेंटर मध्ये लिफ्ट बसवून डागडुजी करणे,भगतसिंग बागेजवळील जलतरण तलाव सुरू करणे,व्यवसाय परवाना शुल्क वाढवणे,सोलर देखभाल दुरुस्ती काम आपण स्वतः केल्यास मासिक १० लाख बचत होईल असे सुचवत महिला व बालकल्याण समितीची तरतूद वाढवण्याची मागणी केली.
रवींद्र माने यांनी शासनावर अवलंबून असणारे बजेट,१८ कोटीच्या लाईट बिलाचा खर्च सोलर बसवून कमी करावा, बीओटी व भाडेतत्वावर जागा देऊन उत्पन्नात वाढ करावी,महिला व बालकल्याण तरतूद ८ ते १० कोटी असावी,परिवहन समितीची तरतूद २५ बसेस मिळणार असल्याने वाढवावी अशा सुधारणा सुचवल्या.
शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे यांनी इमारती डागडुजी,विद्यार्थी गुणवत्ता नियंत्रणासाठी सिसिटीव्ही बसवणे,शुद्ध पेयजल,स्वच्छता गृह यासाठी भरीव तरतूद आवश्यक असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली व निधी वाढवून देणार असल्याचे सभागृहासमोर सांगा अन्यथा त्यानुसार वाटचाल करू असे सांगितल्याने तणाव निर्माण झाला.
परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे यांनी तरतूद १२ ते १५ कोटी करावी व गॅरेज विभागातील कर्मचारी ऐकत नसल्याने कारवाईची मागणी केली.
प्रदीप धुत्रे यांनी आर्थिक विकास वेगाने करणे गरजेचे असून सीएसआर फंडाच्या रक्कमेतून योजना राबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचवले.
राजु बोंद्रे यांनी खर्चास अनुसरून शौचालय साफसफाई होत नाही तसेच गाळयांची भाडेवाढ करण्याची सूचना मांडली.
मागासवर्गीय समिती सभापती रूबेन आवळे यांनी तरतूद ५ कोटी करण्याची मागणी केली.
रुपा बुगड यांनी मध्यवस्तीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करावे तसेच पंचगंगा नदीतरी सुशोभिकरणासाठी तरतुदींची मागणी केली.
अमरजीत जाधव यांनी शाळा एकत्रीकरण करून अतिरिक्त शिक्षकांवर होणारा खर्च टाळावा अशी मागणी केली.
घनकचरा प्रकल्पासाठी लागणारी वाहने शासनाकडून मागणी करण्याचे ठरवण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर महापौर उदय धातूंडे,उपमहापौर अनिल डाळ्या,आयुक्त पल्लवी पाटील,स्थायी समिती सभापती सतीश मुळीक,लेखाधिकारी विकास खोळपे,नगरसचिव राहुल पोटे उपस्थित होते.
कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक मांडल्याचे समाधान-महापौर उदय धातूंडे.
इचलकरंजी शहराच्या नागरिक व मिळकतधारकांवर कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेले अंदाजपत्रक आज मांडण्यात आले याचे मनस्वी समाधान असल्याचे महापौर उदय धातूंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सर्व सभापती निधीसाठी आग्रही
सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांनी जरी अंदाजपत्रकाचे कौतुक केले असले तरी तुटपुंजा निधी दिल्याने रुपाली सातपुते, अरुणा बचाटे,विद्या साळुंखे,रूबेन आवळे यांनी निधीची तरतूद कंम असल्याने निधी वाढवून देण्याची आग्रही मागणी केली.त्यानुसार काही बदल करण्यात आले तर काहीजणांना शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी आणू असे लॉलीपॉप देण्यात आले.
रवींद्र माने यांचे परखड मत
सर्वजण अंदाजपत्रकाचे कौतुक करत असताना नगरसेवक रवींद्र माने यांनी सदर अंदाजपत्रक हे संपूर्णपणे शासनावर अवलंबून आहे असे सांगत बीओटी व भाडेतत्वावर योजना,लाईट बिल बचत असे विविध उत्पन्नवाढीचे उपाय सुचवले,बोलताना त्यांनी देशात राज्यात महायुतीची सत्ता आहे इथे पण आहे असे आम्ही म्हणतोय असा उल्लेख केल्याने उलटसुलट चर्चाना उधाण आले होते
महापौर उदय धातूंडे यांच्याकडे अंदाजपत्रक सादर करताना स्थायी समिती सभापती सतीश मुळीक.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





