ICHMH51NEWS.IN
9921600800

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेला ५०.२५ कोटींचा विक्रमी नफा-स्वप्निल आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेला ५०.२५ कोटींचा विक्रमी नफा-स्वप्निल आवाडे

इचलकरंजी :
आर्थिक अडचणी, व्याजदरातील स्पर्धा आणि मंदीसदृश्य परिस्थिती असूनही कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ५०.२५ कोटी रुपयांचा उच्चांकी नफा मिळविला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय मार्च २०२६ अखेर ४८६९ कोटी रुपयांवर पोहोचला असून त्यामध्ये २९७५ कोटी ठेवी आणि १८९४ कोटी कर्जाचा समावेश आहे.
बँकेचे भागभांडवल ८०.९० कोटी रुपये झाले असून आर्थिक तरतुदीपूर्वीचा नफा ५०.२५ कोटी इतका नोंदविण्यात आला आहे. बँकेचे निव्वळ एनपीए प्रमाण १.९१ टक्के इतके नियंत्रित ठेवण्यात बँकेला यश आले आहे, तर सीआरएआर १५ टक्के आहे.
माजी खासदार व संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनामुळेच बँकेने ही प्रगती साधली असल्याचे बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी सांगितले. आर्थिक वर्षात उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रात मंदी, रेपो रेटमधील बदल तसेच ठेवी व कर्जावरील व्याजदरातील तफावत यामुळे बँकिंग क्षेत्रावर दबाव निर्माण झाला होता. तरीही बँकेने नियोजनबद्ध धोरण राबवत प्रगती कायम ठेवली.
बँकेने लहान कर्जदारांना प्राधान्य देत एकूण कर्जापैकी सुमारे ५० टक्के कर्ज २५ लाखांपर्यंतच्या कर्ज खात्यांना दिले आहे. त्यामुळे लघुउद्योजकांना आर्थिक बळ मिळाले असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचेही पालन करण्यात बँकेला यश मिळाले आहे.
कर्नाटकातील चिक्कोडी येथे नवीन शाखा सुरू करण्यात आली असून गुजरातमध्ये अहमदाबाद व सुरत येथे लवकरच नवीन शाखा सुरू करण्याचा मानस आहे. तसेच इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासही रिझर्व्ह बँकेने परवानगी दिल्याची माहिती स्वप्निल आवाडे यांनी दिली.
ठेवीदारांचा विश्वास आणि कर्जदारांनी वेळेवर केलेली परतफेड यामुळेच बँकेला ही प्रगती साधता आली असल्याचे सांगत चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी सर्व सभासद, ठेवीदार व ग्राहकांचे आभार मानले.
यावेळी बँकेचे व्हाइस चेअरमन सीए संजयकुमार अनिगोळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, महेश सातपुते, बंडोपंत लाड, रमेश पाटील, शैलेश कित्तूरे, बाळकृष्ण पोवळे, द्वारकाधीश सारडा, शैलेश गोरे, सुभाष जाधव, बाबूराव पाटील, तात्यासो अथणे, अविनाश कांबळे, अॅड. सारंग जोशी, तसेच सदस्य राजू चव्हाण, योगेश पाटील, सचिन देवरुखकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, जनरल मॅनेजर किरण पाटील, दिपक पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा