उन्हाळी गर्दी हंगामासाठी इचलकरंजी आगारकडून जादा एसटी बस सेवा सुरू
इचलकरंजी :
उन्हाळी गर्दी हंगाम लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगाराकडून प्रवाशांच्या सोयीसाठी १५ एप्रिल २०२६ पासून विविध मार्गांवर जादा बसफेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये रातराणीसह लांब पल्ल्याच्या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.
इचलकरंजी-मुंबई (कोल्हापूर मार्गे), इचलकरंजी-ठाणे, इचलकरंजी-लातूर, इचलकरंजी-गणपतीपुळे, इचलकरंजी-सोलापूर, इचलकरंजी-बारामती, इचलकरंजी-अक्कलकोट, इचलकरंजी-पुणे, इचलकरंजी-पिंपरी-चिंचवड तसेच इचलकरंजी-बेळगाव या मार्गांवर जादा बसफेऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. काही फेऱ्या रातराणी स्वरूपात असून प्रवाशांना रात्रीच्या प्रवासाचीही सुविधा मिळणार आहे.
या सर्व फेऱ्यांसाठी ऑनलाईन तसेच आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांना बसस्थानकावरून, MSRTC Bus Reservation अॅपद्वारे किंवा एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तिकिटे आरक्षित करता येणार आहेत.
तसेच शासनाच्या निर्णयानुसार महिलांना ५० टक्के सवलत व ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा लागू राहणार आहे. इचलकरंजी व परिसरातील प्रवाशांनी या अतिरिक्त बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





