पूरमुक्तीसाठी इचलकरंजीला ४५० कोटींचा निधी- खा धैर्यशील माने व जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या पाठपुराव्याला यश
इचलकरंजी :
पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नद्यांमुळे दरवर्षी पूरस्थितीचा सामना करणाऱ्या इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील गावांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, पूर नियंत्रणासाठी इचलकरंजी शहराला ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) अंतर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने हा निधी उपलब्ध होणार आहे. एकूण ३,२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये जागतिक बँकेकडून २,२४० कोटी तर राज्य सरकारकडून ९६० कोटी रुपयांचा वाटा असणार आहे. मंत्रिमंडळाने या योजनेस अधिकृत मंजुरी दिली आहे.
हा निधी मिळवण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
या योजनेअंतर्गत पूरप्रवण भागांमध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, पूरग्रस्त नागरिकांना गृहकर्ज सवलत, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) कर्जसवलत आणि विशेष विमा संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कृष्णा नदी खोऱ्यातील पूरधोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक आराखडे तयार केले जाणार असून, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी शहरांमध्ये पाण्याचा जलद निचरा व्हावा यासाठी मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे.
हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्याची क्षमता वाढवणे आणि नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत दिलासा देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
चौकट :
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे इचलकरंजी शहरासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पंचगंगा काठावरील भाग दरवर्षी पुराच्या विळख्यात सापडत असल्याने हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.”
— रवींद्र माने, जिल्हाप्रमुख, शिवसेना
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





