डीकेटीईच्या सेजल पांढरपट्टेची जपानमध्ये २५ लाख पॅकेजवर निवड
इचलकरंजी:
येथील डीकेटीई (DKTE) संस्थेच्या एआय अॅण्ड एमएल (२०२५ बॅच) शाखेची विद्यार्थिनी सेजल पांढरपटटे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत जपानमधील अग्रगण्य ‘राकुटेन मोबाईल’ या बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर पदासाठी निवड मिळवली आहे. तिला कंपनीकडून वार्षिक २५ लाख रुपयांचे आकर्षक पॅकेज देण्यात आले आहे.
‘राकुटेन मोबाईल’ ही जपानमधील प्रमुख दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असून, 4G व 5G सेवा देशभर पुरवते. तसेच ई-कॉमर्स, फिनटेक आणि डिजिटल सेवांद्वारे ३० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेली ही जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित कंपनी आहे. अशा कंपनीत डीकेटीईच्या विद्यार्थिनीची निवड होणे ही संस्थेच्या गुणवत्तेची जागतिक स्तरावर नोंद ठरत आहे.
डीकेटीईमधील अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि कौशल्यविकासावर दिलेला भर यामुळे येथील विद्यार्थी सातत्याने उच्च पॅकेजवर निवड होत आहेत. यापूर्वीही संस्थेतील विद्यार्थ्यांनी ४५ लाख, ४२ लाख, २५ लाख, २२ लाख व १८ लाख पॅकेजवर नामांकित कंपन्यांमध्ये यश मिळवले आहे.
सेजलची ही कामगिरी ही डीकेटीईच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची आणि आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतेची ठोस पावती असल्याचे मत संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे यांनी व्यक्त केले. देशातील सर्वोच्च पॅकेज देणाऱ्या अग्रगण्य संस्थांमध्ये डीकेटीईचा समावेश होत असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व विश्वस्तांनी सेजलचे अभिनंदन केले. तसेच संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ. एस. के. शिरगावे आणि टीपीओ प्रा. जी. एस. जोशी यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
सेजल पांढरपटटे म्हणाली…
“डीकेटीईमध्ये शिक्षण घेताना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. प्रकल्पाधारित शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे माझा आत्मविश्वास आणि तांत्रिक क्षमता मोठ्या प्रमाणात विकसित झाली. आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करण्याची संधी मिळणे हे डीकेटीईने दिलेल्या भक्कम पायाभरणीमुळेच शक्य झाले.”
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






