ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत पोलिसांवरील वाढते हल्ले; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. विशेष वृत्त-अभिजित पटवा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत पोलिसांवरील वाढते हल्ले; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

विशेष वृत्त-अभिजित पटवा

इचलकरंजी (प्रतिनिधी) :

शहरात गेल्या दोन महिन्यांत पोलिसांवर झालेल्या सलग तीन हल्ल्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. कबनूर येथे महापुरुषांचा फलक फाडल्याच्या प्रकरणानंतर निर्माण झालेला तणाव, आंबेडकर जयंतीदरम्यान दोन गटांतील वाद आणि नुकतीच चंदूर येथे घडलेली दगडफेकीची घटना—या तिन्ही प्रकरणांत पोलिसांनाच लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे शहरात पोलिसांचा वचक कमी होत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे, या तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप केला असताना त्यांच्यावरच हल्ले झाले. काही ठिकाणी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले, तर काही पोलिस कर्मचारी जखमीही झाले आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक मानली जात असून, कायद्याचा धाक कमी होत असल्याचे संकेत मानले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर शहरात दबंग, कडक आणि निर्णयक्षम अधिकाऱ्यांची गरज व्यक्त होत आहे. गुन्हेगारांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाल्यासच अशा घटनांना आळा बसेल, असे जाणकारांचे मत आहे. केवळ गुन्हा दाखल करून थांबण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना, गस्त वाढवणे आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.

पोलीस प्रशासनाने सामाजिक संस्थांशी सुसंवाद ठेवण्याची गरज

दरम्यान, पोलिस आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी करण्याचीही गरज निर्माण होत आहे.डीवायएसपी निलाभ रोहन यांच्या २२ दिवसात धडाकेबाज कामगिरीनंतर त्यांची तडकाफडकी झालेली बदली ब त्यांनतर त्यांच्या समर्थनार्थ इचलकरंजीची जनता रस्त्यावर उतरली होती.गेल्या २-३वर्षात पोलीस प्रशासनाची जनतेशी संवादाची नाळ तुटलेली दिसत आहे कारण तीनवेळा पोलिसांवर हल्ले होऊनही पोलिसांच्या समर्थनार्थ नागरिक का येत नाहीत याबाबत पोलिसांनी चिंतन करणे आवश्यक आहे.

तक्रारदार व सामान्य जनतेशी नम्र व संवेदनशील वागणूक ठेवल्यास पोलिसांविषयी विश्वास आणि आपुलकी वाढू शकते. सध्या काही ठिकाणी नागरिकांना पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची भावना असल्याने हा दुरावा वाढत असल्याचे बोलले जाते.तसेच, आरोपी व गुन्हेगारांना दिली जाणारी प्रतिष्ठेची वागणूकही धोकादायक ठरत असल्याची टीका होत आहे. अशा वागणुकीमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक कमी होऊन ते अधिक बेधडक होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आरोपींना कायद्याचे कठोर पालन करावे लागेल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने देणे गरजेचे आहे.एकूणच, वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कडक धोरण स्वीकारत जनतेचा विश्वास परत मिळवणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

पोलिसांच्या कारवाईपेक्षा आरोपींच्या सुटकेची प्रसिद्धी जास्त.

कोणत्याही गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी कारवाई करत आरोपीना ताब्यात घेतल्यानंतर कारवाईची चर्चा सुरू होताच आरोपीना जामीन मिळाल्याच्या बातम्यांना जोरदार प्रसिद्धी मिळते त्यातून गुन्हेगाराना आपण काही केले तरी चालते जामीन होतोच अशा प्रकारचा संदेश जातो व त्यांचे धाडस वाढते यामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपीना कायदेशीररित्या जबर शासन कसे करता येईल याबाबत उपाययोजना होणे आवश्यक आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा