इचलकरंजी शहराला वेठीस धरण्याचा अधिकार कोणालाही नाही : मदन कारंडे यांचा इशारा
इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भात इचलकरंजी शहराला वेठीस धरण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचा इशारा मदन कारंडे यांनी दिला आहे. मजरेवाडी उपसा बंद करण्याच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र आक्षेप घेत, हा निर्णय शहरातील सुमारे ५ लाख नागरिकांवर अन्याय करणारा असल्याचे म्हटले आहे.
कारंडे यांनी प्रश्न उपस्थित करताना काळ्या ओढ्याला बांध घालण्याचा अधिकार आंदोलनकर्त्यांना कोणी दिला, असा सवाल केला. पंचगंगा नदीचे प्रदूषण हा गंभीर विषय असून त्याचा फटका शिरोळ परिसरासह इचलकरंजी शहरालाही मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मजरेवाडी ते इचलकरंजी पाणीपुरवठा योजनेतून अनेक गावांना व शेतकऱ्यांना पाणी दिले जात असल्याचा उल्लेख करत, अशा परिस्थितीत उपसा बंद करून शहर व शेतकरी दोघांनाही वेठीस धरणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंचगंगा प्रदूषणासाठी केवळ इचलकरंजी जबाबदार नसून कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील नाले, औद्योगिक सांडपाणी, साखर कारखाने, एमआयडीसी आणि इतर घटकही तितकेच जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रदूषण मुक्तीसाठी आमदार, खासदार व प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्य दिसत नसल्याची टीका करत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या दुर्लक्षामुळेच परिस्थिती गंभीर झाल्याचे कारंडे म्हणाले. काही मोजक्या उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदूषणासाठी संपूर्ण शहराला दोष देणे चुकीचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी रस्त्यावर व कायदेशीर लढाईस इचलकरंजीकर तयार असल्याचे सांगत, मजरेवाडी उपसा बंद करण्याऐवजी प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व लोकप्रतिनिधी यांच्याशी संवादातून तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी आंदोलनकर्त्यांना केले.
दरम्यान, शहर-गाव संघर्ष टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नदीकाठच्या गावांचे प्रतिनिधी, आंदोलनकर्ते, इचलकरंजीचे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणीही मदन कारंडे यांनी केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






