इचलकरंजीतील ‘क-१ शेरा’ हटण्याचा मार्ग मोकळा,
आ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील हजारो मिळकतींवरील प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेला ‘क-१ शेरा’ हटविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव तातडीने कॅबिनेटसमोर सादर करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आमदार राहुल आवाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शहराचा विकास आराखडा अद्याप अंतिम न झाल्यामुळे तसेच नगररचना योजना क्र. १ व २, सत्ताप्रकार ‘क’, बी टेन्युअर आदी प्रश्न प्रलंबित राहिल्याने हजारो मिळकतधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामुळे महानगरपालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न आणि शासनाचा महसूलही थांबला होता.
‘क-१ शेरा’मुळे बांधकाम परवाने मिळण्यात अडथळे, कर्ज तारण, मॉर्गेज, नकाशा मंजुरी तसेच क्षेत्र मोजणीतील विसंगती अशा विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांनी हा प्रश्न शासनदरबारी सातत्याने मांडला होता.
यासंदर्भात मंत्रालयात गुरुवारी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत इचलकरंजी नगरपरिषदेने भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करण्यास मान्यता दिली होती; मात्र मनुष्यबळाच्या अभावामुळे मोजणी शक्य नसल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर ‘सारथी इंजिनियर्स, पुणे’ या खाजगी संस्थेमार्फत प्रत्यक्ष मोजणी करून अभिलेख तयार करण्यात आले असून ते जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, कोल्हापूर यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. तरीही पुढील कार्यवाही न झाल्याने प्रश्न प्रलंबित राहिला होता.
चर्चेनंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाचा सविस्तर व अभ्यासपूर्ण अहवाल तातडीने कॅबिनेटसमोर सादर करण्याचे निर्देश देत हा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल, असे स्पष्ट केले.
या बैठकीस प्रांताधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, महापौर उदय धातुंडे, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रक्रियेत महसूल विभागाचे मुख्य सचिव विकास खारगे यांचेही सहकार्य लाभले.
या निर्णयामुळे शहरातील हजारो मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आ.राहुल आवाडे,महापौर उदय धातूंडे व अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







