इचलकरंजीत गांजा विक्री करणारे दोघे जेरबंद; 2.24 लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी :
इचलकरंजी शहरात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातून 4 किलो 150 ग्रॅम गांजा, अॅक्सीस मोपेड, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 2 लाख 24 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ साठा, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथके तयार करून माहिती संकलन सुरू केले होते.
दरम्यान, पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, इचलकरंजीतील नदीवेस परिसरातील जॅकवेलजवळ दोन इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला.
दि. 2 मे रोजी छापा टाकून सारंग खंडू भोसले (वय 21, रा. गुलमोहर कॉलनी क्र. 3, कुपवाड रोड, मिरज, जि. सांगली) व अभय दिगंबर धुमाळ (वय 21, रा. बावणे गल्ली, इचलकरंजी) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 4 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







