नसरापूर प्रकरणाच्या निषेधार्थ इचलकरंजीत संताप; आरोपीस फाशीची मागणी
इचलकरंजी:
पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून इचलकरंजीतही संताप व्यक्त करण्यात आला. सकल ब्राह्मण समाज इचलकरंजी यांच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करत आरोपीस त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, नसरापूर येथील घटना अत्यंत क्रूर, अमानुष आणि संतापजनक असून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्दयी हत्या करण्यात आल्याने महिलां व लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोपीला अटक करण्यात आली असली तरी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित आरोपीस मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात आणि शासनानेही कायदे अधिक कठोर करावेत, अशी मागणी करण्यात आली.
निदर्शनांमध्ये सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी व समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निदर्शने करताना ब्राम्हण समाजातील पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




