चार पिढ्यांचा अनुकरणीय परिवार स्नेहसोहळा
इचलकरंजी ता. ७ इचलकरंजी येथे गेले शतकभर वास्तव्याला असलेल्या तारदाळकर कुलकर्णी परिवाराच्या चार पिढ्यांचा पारिवारिक स्नेहमेळावा अतिशय आनंदात व उत्साहात संपन्न झाला.चार पिढ्याना एकत्र आणणारा व त्यातून नात्यांची वीण घट्ट करणारा हा स्नेहमेळावा आपली माणसं समजून घेण्यासाठी इतरांनीही अनुकरण करावा असा होता यात शंका नाही.अलीकडे जीवनाच्या गतिशीलतेमुळे आणि प्रत्येकाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे कौटुंबिक संवादही दुर्मिळ होत चालला आहे हे वास्तव आहे. अशावेळी आपल्या परिवाराचे ऋणानुबंध अधिकाधिक घट्ट व्हावेत, आपल्यातील जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा, आपली नाती सुदृढ व्हावीत आणि मुख्य म्हणजे आपला परिवार नेमका कसा व किती आहे याची जाणीव नव्या – जुन्या सर्वांनाच व्हावी या हेतूने मुद्दाम आयोजित केलेला तारदाळकर कुलकर्णी परिवाराचा हा पारिवारिक स्नेहमेळावा फार महत्वाचा ठरतो.
तारदाळकर कुलकर्णी परिवाराला गंगाधर खंडो कुलकर्णी यांच्यापासूनचा गेल्या दीडशे – पावणेदोनशेहून अधिक वर्षाचा ज्ञात इतिहास आहे. या परिवारातील कालवश आत्माराम कुलकर्णी ( १८९५ ते १९४५ ) आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई ( १९०० ते १९७७) या दांपत्याला केशव, शकुंतला, लीला ,गोपाळ ,कमल, माधव ,रघुनाथ आणि महानंदा उर्फ बेबी अशी आठ अपत्ये होती. यातील शकुंतला यांचा बाळण्णवर कुटुंबात, स्वातंत्र्यसैनिक लीला यांचा जांभळीकर कुलकर्णी कुटुंबात, कमल यांचा वडगावकर जोशी कुटुंबात तर महानंदा उर्फ बेबी यांचा हेर्लेकर कुलकर्णी कुटुंबात विवाह झाला होता.
या आठ भावंडांपैकीआज कोणीही हयात नाहीत. तसेच यातील पहिल्या तिघांची जन्मशताब्दीही होऊन गेलेली आहे. या परिवारात सख्खे ,चुलत,आते, मामे बहिणभाऊ आणि त्यांचा पुढील दोन-तीन पिढ्या आहेत. सुखद सोहळे आणि दुःखद प्रसंग यानिमित्ताने सर्वच परिवाराच्या अधून मधून गाठीभेटी होत असतात. पण असे परिवार म्हणून सर्वांनी एकत्र ठरवून भेटण्याचा हा मंगलमय सोहळा होता. असे प्रसंग दुर्मिळ असतात.मात्र ते होत राहिले पाहिजेत हेही खरेच.
या पारिवारिक मेळाव्यामध्ये आत्माराम उर्फ मामा आणि रुक्मिणीबाई उर्फ अक्का या दांपत्यासह त्यांच्या आठही अपत्यांची छायाचित्रे असलेला फलक मंचावर लावण्यात आलेला होता.आज तारदाळकर कुलकर्णी परिवारात रघुनाथराव यांच्या पत्नी मीनाकाकू या नव्वद वर्षाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिवाराच्या चार पिढ्यांचे हे कौटुंबिक स्नेहसंमेलन होते. सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून मध्यवर्ती ठिकाण पुणे निवडले गेले.पुण्यात एका मंगलकार्यालयात हा पारिवारिक सोहळा आयोजित केला होता.त्यात मुली – मुले , जावई – सुना,नात – नातू , पणतू – पणती, खापरपणतू-खापर पणती असे वयाच्या नव्वदीपासून दोन महिन्यांच्या बाळापर्यंत परिवारातील अनेक जण सहभागी होते. गप्पागोष्टी, स्नेहभोजन, जुन्या आठवणी, सध्या सुरू असलेली वाटचाल, भविष्यातील दिशा अशा अनेक बाबींचा संवादी आनंद घेत हा पारिवारिक मेळावा संपन्न झाला. खरेतर परिवारातील असूनही नव्या पिढीतील काहीजण यावेळी एकमेकांना प्रथमच भेटत होते. प्रत्येकाला बरेच बोलायचे ,भेटायचे ,ऐकायचे होते त्यामुळे
एक दिवसाचा वेळ यासाठी अपुरा पडला अशी सर्वांची भावना झाली. मात्र तरीही सध्याच्या अतिशय कडक उन्हाळी वातावरणात हा भावनिक ओलावा परिवारातील प्रत्येक घटकाला सुखावून गेला यात शंका नाही.
या परिवारातील अनेकजण महाराष्ट्राच्या व भारताच्या कानाकोपऱ्यात तसेच परदेशातही कामानिमित्त स्थायिक आहेत. बहुतांशजण उच्च विद्या विभूषित आहेत. काहींचे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह झाले आहेत. तसेच अनेकांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात भूतकाळात आणि वर्तमानकाळातही नावलौकिकही मिळवलेला आहे.
चार पिढ्यांनी एकत्र येण्याचा असा हा पहिलाच प्रसंग होता. या पहिल्या स्नेह मेळाव्याला काहीजण कामामुळे सहभागी होऊ शकले नाहीत.मात्र या परिवाराच्या व्हाट्सअप समूहावर सर्वजण सक्रिय सहभागी आहेतच. या समूहावर गेल्या अनेक दशकातील दुर्मिळ फोटोही अनेकांनी पाठविले. त्यामुळे आठवणींचे रंग अधिक गडद झाले.तर काहींना नव्यानेच सारे काही समजून घेता आले.
आता सर्वजणांनी पुन्हा एकत्र यायचे असे यावेळी ठरविण्यात आले.मुख्य म्हणजे या सर्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी नव्या पिढीने आनंदाने स्वीकारली आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




