दारूच्या नशेत रोजच्या वादातून पत्नी व मुलांकडून पित्याचा खून; कबनूर हादरले
इचलकरंजी:
कबनुर येथे घरगुती वादातून पत्नी व दोन मुलांनी मिळून कुटुंब प्रमुखाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बाळू बापू बामणे (वय ५८, रा. शिवाजी कॉर्नर, कबनूर, ता. हातकणंगले) यांचा खून झाला असून, या प्रकरणी अमोल गणपती बामणे (वय ३७, व्यवसाय पॉवरलूम, रा. सहारा नगर, गल्ली नं.६, रुई, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. मयत बाळू बामणे हे फिर्यादीचे चुलते होत.
या प्रकरणी सुनिता बाळू बामणे (वय ४५), यश बाळू बामणे (वय २०) व ओम बाळू बामणे (वय २३, सर्व रा. शिवाजी कॉर्नर, कबनूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे अनुक्रमे मयताची पत्नी व दोन मुले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी रात्री ८ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास कबनूर येथील राहत्या घरी ही घटना घडली. मयत बाळू बामणे हे दारूच्या नशेत आरोपींना दररोज शिवीगाळ व मारहाण करत असल्याचा आरोप आहे. याच रागातून आरोपींनी संगनमत करून बाळू बामणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या पाठीवर चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







