ICHMH51NEWS.IN
9921600800

संवेदनशील कलावंताचा प्रेरणादायी प्रवास; विभावरी देशपांडे यांनी उलगडले कला, साहित्य आणि बालरंगभूमीचे विश्व

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संवेदनशील कलावंताचा प्रेरणादायी प्रवास; विभावरी देशपांडे यांनी उलगडले कला, साहित्य आणि बालरंगभूमीचे विश्व

इचलकरंजी :
येथील आपटे वाचन मंदिर आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’त ‘संवाद एका संवेदनशील कलावंताशी’ या विषयावर प्रसिद्ध लेखिका, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका विभावरी देशपांडे यांची प्रकट मुलाखत रंगली. यावेळी त्यांनी आपल्या बहुआयामी कलाप्रवासातील अनुभव, साहित्यप्रेम, बालनाट्यावरील भूमिका आणि आजच्या पिढीबाबतचे विचार अत्यंत मनमोकळेपणाने मांडले.
लहानपणापासून घरातील साहित्यिक आणि नाट्यसंस्कारांमुळेच आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली, असे सांगताना विभावरी देशपांडे यांनी पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर असलेल्या आपल्या वडिलांच्या ‘इंटरनॅशनल’ या पुस्तक दुकानामुळे वाचनाची गोडी लागल्याचे सांगितले. आई नाट्यसमीक्षक असल्याने बालपणापासूनच नाटकांच्या वातावरणात वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयीन जीवनात ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेत उत्कृष्ट लेखन व दिग्दर्शनाचे पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख करताना त्यांनी नाटककार महेश एलकुंचवार यांच्या कार्यशाळेमुळे लेखनाला दिशा मिळाल्याचे सांगितले. तसेच सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळांमध्ये अभिनयाचे धडे घेतल्याने अभिनय अधिक समृद्ध झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी लाभणे हा आयुष्यातील मोठा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. बालनाट्य क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी या क्षेत्राकडे प्रतिभावान मंडळी कमी वळत असल्याची खंत व्यक्त केली. पैसा आणि प्रसिद्धी कमी मिळत असली तरी मुलांच्या संवेदनशील घडणीत बालनाट्याचे महत्त्व मोठे असल्याने आपण जाणीवपूर्वक या क्षेत्रात कार्यरत राहिल्याचे त्यांनी सांगितले.
कलाप्रवासातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी संदीप खरे यांच्या ‘कधी तरी वेड्यागत’ कार्यक्रमातील कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. तसेच नटरंग, बालगंधर्व आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांमधील भूमिकांचे अनुभवही त्यांनी सांगितले. “अभिनयामुळे आपण जे नसतो ते आयुष्य अनुभवता येते,” असे त्या म्हणाल्या.
लेखनाबाबत बोलताना त्यांनी साराची डायरी आणि निरभ्र या पुस्तकांचा उल्लेख केला. मुलांचे स्वतंत्र भावविश्व समजून घेण्याचा प्रयत्न ‘साराची डायरी’मधून केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या मुलांबद्दल बोलताना त्यांनी माहिती आणि ज्ञान यामधील फरक समजून घेण्याची गरज अधोरेखित केली. रील्स, व्हिडिओ आणि चॅट जीपीटीसारख्या माध्यमांचा अतिरेक मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याची जाणीव व्यक्त करत त्यांनी याच विषयावर आधारित ‘मग तू मला खा’ हे नाटक साकारल्याचे सांगितले.
शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलताना त्यांनी नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. “पूर्वी ५०० मीटरही चालता येत नव्हते, पण आज मी मॅरेथॉन पूर्ण करते,” असे सांगत व्यायाम हा मानसिक शांततेचाही मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. इचलकरंजीतील रसिक ‘जाणकार’ असल्याचे गौरवोद्गार काढत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकार्यवाह प्रा. डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी स्वागत केले. प्रायोजक प्रशांत होगाडे आणि श्यामसुंदर मर्दा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मुलाखत आणि आभार प्रदर्शन संचालिका मीनाक्षी तंगडी यांनी केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा