ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह तिघांना अटक ६.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह तिघांना अटक

६.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई

इचलकरंजी :
 टाकवडे रोड परिसरात दिवसा घरफोडी करून १० लाखांहून अधिक किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यासह त्याच्या दोन साथीदारांना इचलकरंजी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. या कारवाईत ६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत टाकवडे रोड परिसरातील उल्हास विठ्ठल भोसले (वय ५०) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ११ तोळे ५ ग्रॅम ३५ मिली सोने, ७ भार चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असा एकूण १० लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६१/२०२६ दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा सराईत घरफोड्या विनायक गजानन कुंभार (रा. गावभाग, इचलकरंजी) याने त्याचे साथीदार लक्ष्मीकांत उर्फ तम्मा नाटेकर (रा. विठ्ठलनगर, शहापूर) व अनिल कासाप्पा कल्याणी (रा. विठ्ठलनगर, शहापूर) यांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी पंचगंगा नदी नाका परिसरातून तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विनायक कुंभार याच्याकडून त्याच्या घरातून चोरीतील ८०.७५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७२.९९ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच आरोपींकडील दोन मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पोसई गोविंदा कोळेकर, पोहेकॉ अनिल पाटील, उदय करडे, फिरोज बेग, अमर शिरढोणे, विजय माळवदे, बाजीराव पोवार व प्रमोद आंबी यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा