ICHMH51NEWS.IN
9921600800

‘ए आय’ मुळे मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होणे शक्य  – अतुल कहाते, पुणे 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

‘ए आय’ मुळे मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होणे शक्य– अतुल कहाते, पुणे 

इचलकरंजी:
“आज आपल्या जीवनातील सर्वच क्षेत्रात ए आय तंत्राचा खूप मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. त्यामुळे एकूणच मानवी जीवनावर परिणाम होणार आहे. ‘ए आय’मुळे भविष्यात अनेक संधी निर्माण होणार आहेत तसेच अनेक आव्हानेही आपल्यासमोर उभी राहतील” अशा आशयाचे प्रतिपादन माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आणि प्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी केले. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आयोजित मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी ‘ए आय चे अदभूत विश्व’ या विषयावर त्यांचे प्रभावी व्याख्यान संपन्न झाले.
व्याख्यानमालेचे हे ४८वे वर्ष असून यावेळी प्रमुख पाहुणे ए. आर. तांबे आणि अतुल शहा तसेच कहाते यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना तांबे यांनी “व्याख्यानमालेसारखे प्रबोधनपर उपक्रम हे आज समाजातील नागरिकांच्या आणि युवकांच्या दृष्टीने  उपयुक्त आहेत आणि त्याचा लाभ त्यांना आपल्या जीवनात होऊ शकतो” असे उद्गार काढले. सुरुवातीला मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर मर्दा फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त शामसुंदर मर्दा यांच्या हस्ते पाहुण्यांना गुलाब पुष्प व भेटवस्तू प्रदान करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष घनशाम सावलानी उपस्थित होते. उपक्रम समन्वयक संजय होगाडे यांनी प्रास्ताविक केले. संतोष आबाळे यांनी सूत्र संचालन केले तर काशीनाथ जगदाळे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
आपल्या माहितीपूर्ण व्याख्यानात कहाते यांनी ए. आय. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्म, सुरुवातीचे संशोधन, संगणकाला विविध विषय शिकविण्यासाठी झालेले प्रयत्न तसेच हे तंत्र विकसित करण्यामागील वैज्ञानिकांचे योगदान याचा सविस्तर आढावा घेतला. या क्षेत्रातील महत्त्वाचे संशोधक जेफरी हिंटन तसेच इतरही अनेक शास्त्रज्ञांच्या संशोधनाची माहिती त्यांनी दिली. मशीन लर्निंग, डीप लर्निंग, २०१२ नंतर चित्र ओळख तंत्रज्ञानात झालेली प्रगती आणि २०२२ नंतर मानवी भाषेचे आकलन करणाऱ्या आधुनिक ए आय प्रणालींचा प्रवास त्यांनी सोप्या भाषेत उलगडून सांगितला.
“भविष्यात शिक्षण, उद्योग, व्यवसाय, वैद्यकीय, इत्यादी सर्व क्षेत्रात आणि दैनंदिन जीवनामध्ये ‘ए आय’मुळे मोठे बदल घडणार असून, या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणारेच भविष्यात सक्षमपणे पुढे जातील” असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी ए आय कडे भीती म्हणून नव्हे तर नवी संधी म्हणून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“ए आय  हा आज मानवी जीवनातील अविभाज्य भाग
असून हे केवळ तंत्रज्ञान नाही तर ती एक नवी क्रांती आहे. आज आपण गुगल मॅप्सपासून ते चॅट जीपीटीपर्यंत पावलोपावली या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता मशीनमध्ये विकसित करणे, हे या तंत्रज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.” अशी माहिती त्यांनी दिली. भविष्यात हे तंत्रज्ञान मानवाचा वेळ वाचवण्यासाठी आणि क्लिष्ट कामे सुलभ करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तंत्रज्ञानाच्या चांगल्या बाजू मांडतानाच कहाते यांनी यामधील धोक्यांबाबतही उपस्थितांना सतर्क केले. “एआय मुळे काही नवीन स्टार्टअप उद्योग सुरू होऊ शकतील पण अनेक क्षेत्रांतील नोकऱ्याही कमी होण्याची शक्यता आहे. माहितीची गोपनीयता राखणे हे भविष्यात मोठे आव्हान ठरणार आहे. चुकीच्या माहितीचा प्रसार आणि बनावट व्हिडिओ यांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते” असे ते म्हणाले.
व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी युवकांना, विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना काळानुसार बदलण्याचे आवाहन केले. “तंत्रज्ञानापासून दूर पळून चालणार नाही, तर त्याचा विधायक वापर कसा करता येईल हे शिकणे काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी मांडले. व्याख्यानाच्या शेवटी उपस्थित श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक व अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट हाॅलमध्ये झालेल्या या व्याख्यानास शहर व परिसरातील तंत्रज्ञानप्रेमी विद्यार्थी, युवक, शिक्षक आणि रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्ञानवर्धक आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या या व्याख्यानामुळे उपस्थितांना ‘एआयचे अदभूत विश्व’ नव्या दृष्टिकोनातून अनुभवता आले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा