मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणारच; वाहतूक शिस्तीसाठी कडक उपाययोजना
श्रमिक पत्रकार संघ-प्रेस क्लब चर्चासत्रात महापौरांचा इशारा
इचलकरंजी :
इचलकरंजी शहरातील मुख्य रस्ते हे शहराच्या रक्तवाहिन्यांप्रमाणे असून त्यामध्ये अडथळे निर्माण झाल्यास संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम कोणाचीही मुलाहिजा न बाळगता राबविण्यात येणार असून वाहतूक व्यवस्थेलाही कडक शिस्त लावण्यात येईल, असा ठाम सूर श्रमिक पत्रकार संघ व प्रेस क्लब यांच्या वतीने आयोजित चर्चासत्रात उमटला.
पत्रकार कक्षात झालेल्या या चर्चासत्रास महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक किरण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रेस क्लब अध्यक्ष अरुण काशिद यांनी स्वागत केले, तर प्रास्ताविक संजय खुळ यांनी केले.
कोल्हापूर नाका ते झेंडा चौक या मुख्य मार्गावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविल्यानंतर रस्ता मोकळा झाला असला तरी आता त्या ठिकाणी चारचाकी वाहने, टेम्पो आणि ट्रॅव्हल्सची अनधिकृत पार्किंग वाढल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर महापौर धातुंडे यांनी तातडीने कारवाई करण्याऐवजी प्रथम त्या ठिकाणी ‘नो पार्किंग’ फलक लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. त्यानंतर वाहतूक शाखेमार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा दुसरा टप्पा डेक्कन चौक ते संभाजी चौक या मुख्य मार्गावर लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या मोहिमेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा अभ्यास सुरू असून त्यावर उपाययोजना आखण्यात येत आहेत. मात्र लवकरच या मार्गावर धडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी शहरात चार झोन निश्चित करण्याबरोबरच व्यंकोबा मैदान, महात्मा फुले मार्केट तसेच इतर ठिकाणी गाळे भाड्याने देणे आणि बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत मुख्य रस्त्यांवर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ देणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
उपमहापौर अनिल डाळ्या यांनी शहरातील रस्त्याकडेला वर्षानुवर्षे पडून असलेल्या भंगार वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली. वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक किरण कांबळे यांनी शहरातून जड वाहनांना दुपारी २ ते ४ या वेळेतच प्रवेश दिला जात असल्याचे सांगितले. मोठे ट्रक, ट्रॅव्हल्स आणि जड वाहने आरक्षित जागेत उभी करून लहान वाहनांतून माल शहरात आणण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकली मार्केट परिसरात रिक्षा व विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होत असल्याने अचानक भेट देऊन कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सिग्नल यंत्रणेत शिस्त आणणे, ‘पे अँड पार्क’ सुविधा उभारणे आणि शहरात नव्याने दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी दिली.
या नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी महिनाभरानंतर पुन्हा चर्चासत्र आयोजित करण्यात येईल, असे अध्यक्ष बाबासाहेब राजमाने यांनी आभार प्रदर्शनावेळी सांगितले.
यावेळी सुनील मनोळे, मयुर चिंदे, अमर चिंदे, रामचंद्र ठिकणे, सुभाष भस्मे, इराण्णा सिंहासने, अतुल आंबी, पंडित कोंडेकर, संदीप जगताप, दयानंद लिपारे, शिवानंद रावळ, छोदुरसिंग रजपूत, विजय चव्हाण, पंकज चव्हाण, बसवराज कोटगी आदी पत्रकार उपस्थित होते.
रिक्षा स्टॉपचीही होणार तपासणी
शहरात विविध ठिकाणी अनधिकृत रिक्षा स्टॉप उभारण्यात आले असून मुख्य रस्ते तसेच एसटी स्टँड परिसरातही ही समस्या वाढत आहे. संबंधित थांबे अधिकृत की अनधिकृत, तसेच प्रत्येक ठिकाणी किती रिक्षांना परवानगी आहे याची तपासणी लवकरच केली जाणार असल्याचे महापौर उदय धातुंडे यांनी सांगितले. याबाबत रिक्षा संघटनांसोबत बैठक घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.
वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल नाराजी
वाहतूक समस्यांवरील चर्चेसाठी आयोजित कार्यक्रमास पोलिस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड आणि शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक प्रशांत निशाणदार अनुपस्थित राहिल्याने लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाहतूक व्यवस्थेप्रती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची उदासीनता असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







