ICHMH51NEWS.IN
9921600800

पाणी योजनेबाबत सभागृहातील ठरावानंतर नवा प्रस्ताव, आयुक्त,महापौर, उपमहापौरांची बांधिलकी कुणाशी?

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाणी योजनेबाबत सभागृहातील ठरावानंतर नवा प्रस्ताव, आयुक्त,महापौर, उपमहापौरांची बांधिलकी कुणाशी?

विशेष वृत्त-अभिजित पटवा

इचलकरंजी : इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू झाली असून सभागृहाने मंजूर केलेल्या सुळकुड पाणी योजनेच्या पाठपुराव्याच्या ठरावानंतर नव्या प्रस्तावित योजनेच्या हालचालींमुळे शहरात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गेल्या सुमारे १४ वर्षांपासून इचलकरंजी शहरासाठी कुंभोज, काळम्मावाडी थेट पाईपलाईन, वारणा–दानोळी मार्गे तसेच कोथळी मार्गे अशा विविध पाणी योजनांचे पर्याय चर्चेत आले; मात्र या सर्व योजना विविध कारणांमुळे पुढे जाऊ शकल्या नाहीत. सध्या शहरासाठी मंजूर असलेली सुळकुड उद्भव धरून दूधगंगा नदीतील पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहे.

१२ मे २०२६ रोजी इचलकरंजीच्या पाणीपुरवठा प्रश्नावर विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये विविध नगरसेवकांनी आपली भूमिका मांडत सुळकुड योजना शहरासाठी किफायतशीर आणि व्यव्हार्य असल्याचे मत व्यक्त केले. सत्ताधारी गटनेते विठ्ठल चोपडे यांनी योजनेबाबत सविस्तर विवेचन केले होते. त्यानंतर सभागृहाने या योजनेच्या पाठपुराव्यासाठी एकमुखी ठराव मंजूर केला. त्यानंतर शिवशाहू आघाडीच्या वतीने या योजनेच्या समर्थनार्थ जलपदयात्राही काढण्यात आली.

मात्र त्यानंतर ८ जून रोजी आमदारांनी जुने दानवाड उद्भव धरून नव्या राधाकृष्ण पाणी योजनेची घोषणा केली. त्यानंतर आमदार, खासदार तसेच आयुक्त, महापौर आणि उपमहापौर यांनी १८ जून रोजी मुंबई येथे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या योजनेचे सादरीकरण केले. पुढे २० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांनी आमदार आणि खासदारांनी सुचविलेल्या योजनेला मंजुरी देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली

दरम्यान, शहरातील नागरिकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, १२ मे रोजी सभागृहाने मंजूर केलेल्या सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीवर पुढाकार घेण्याऐवजी नव्या योजनेचा पाठपुरावा का करण्यात आला? सभागृहाचा निर्णय आणि त्यानंतरच्या प्रशासकीय हालचाली यामध्ये सुसंगती आहे का, आयुक्त महापौर उपमहापौर यांची बांधिलकी सभागृहाशी नसल्याची चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इचलकरंजीच्या पाणीप्रश्नाचा इतिहास माहिती असून यापूर्वीही विविध टप्प्यांवर आश्वासने देण्यात आली होती, असा उल्लेखही करण्यात येत आहे. वारणा योजनेचे उद्घाटन तसेच थेट पाईपलाईन पर्यायाविषयी यापूर्वी वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याचेही बोलले जात आहे.

दुसरीकडे, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सध्या आव्हानात्मक असून अनेक योजनांमधील स्वहिस्सा उभारण्यात अडचणी येत असल्याने कर्ज काढावे लागत आहे.

राज्य शासनाकडून नव्या योजनेसाठी बिनव्याजी कर्जरूपाने निधी देण्याबाबत चर्चा असली तरी भविष्यात उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच पुढील काळात सहाय्यक अनुदान कमी होण्याची शक्यता आणि कर्मचाऱ्यांचे वेतन व्यवस्थापन यांसारखी आव्हानेही चर्चेत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा