झोपडपट्टी सर्वेक्षणातून घरकुल योजनांना गती; लोकप्रतिनिधींनी जनजागृती करावी – खासदार धैर्यशील माने
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएट्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील २७ झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष सर्वेक्षण व घरकुल निर्मितीबाबत सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींनी सकारात्मक जनजागृती करावी, असे आवाहन केले.
बैठकीला आमदार राहुल आवाडे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे व उपायुक्त अशोक कुंभार उपस्थित होते. आयुक्त पल्लवी पाटील यांनी सीएसआर माध्यमातून होणाऱ्या या प्रकल्पामुळे महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याचे सांगितले. शेल्टर असोसिएट्सच्या संचालिका प्रतिमा जोशी यांनी डिजिटल सर्व्हे अॅप, गुगल प्लस कोड आणि मॅपिंगच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनांसाठी तांत्रिक सहकार्य केले जाणार असल्याची माहिती दिली.
यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी घरकुल प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. बैठकीत महापालिका व शेल्टर असोसिएट्स यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. नगरसेवकांच्या विविध प्रश्नांनाही मान्यवरांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रधानमंत्री आवास योजनेच्या तांत्रिक कक्षाच्या प्रमुख शुभांगी जोशी यांनी केले.
सामंजस्य कराराप्रसंगी खासदार धैर्यशील माने,आ.राहुल आवाडे,उपमहापौर अनिल डाळ्या व प्रतिमा जोशी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






