दैनिक महासत्ताचे संपादक वसंतराव दत्तवाडे यांना पत्रकारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
इचलकरंजी :
दैनिक महासत्ताचे संपादक दिवंगत वसंतराव दत्तवाडे यांच्या निधनाबद्दल इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि प्रेस क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभा घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी दत्तवाडे यांच्या पत्रकारिता, सामाजिक योगदान आणि मार्गदर्शनाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
पत्रकार कक्षात झालेल्या शोकसभेला श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासो राजमाने आणि प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष अरुण काशिद प्रमुख उपस्थित होते. यावेळी बाबासो राजमाने, दयानंद लिपारे, संजय खूळ, रामचंद्र ठिकणे, अभिजित पटवा, सुनील मनोळे, सुभाष भस्मे, धर्मराज जाधव, पांडूरंग पिळणकर, बसवराज कोटगी आणि अरुण काशिद यांनी आपल्या भावना व्यक्त करत दिवंगत दत्तवाडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
वक्त्यांनी सांगितले की, इचलकरंजी शहराच्या जडणघडणीत वसंतराव दत्तवाडे यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांनी पत्रकारितेत अनेकांना मार्गदर्शन करत नवी पिढी घडविण्याचे काम केले. स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहून कोणत्याही पदाचा किंवा पुरस्काराचा मोह न बाळगता इतरांना बळ देण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी होती.
शहर आणि समाजासाठी केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन इचलकरंजीतील एखाद्या प्रमुख चौकाला त्यांचे नाव देण्यात यावे तसेच त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणीही यावेळी उपस्थित पत्रकारांनी केली.
शोकसभेला अजय काकडे, हुसेन कलावंत, इराण्णा सिंहासने, शिवानंद रावळ, विजय चव्हाण, अतुल आंबी, ऋषिकेश राऊत, मयूर चिंदे आदी पत्रकार उपस्थित होते.
स्व.वसंतराव दत्तवाडेना आदरांजली वाहताना पत्रकार
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







