ICHMH51NEWS.IN
9921600800

महापालिकेची सर्वसाधारण सभा; राधाकृष्ण योजनेच्या डीपीआर वरून वादाची शक्यता विविध १९ विषयांवर होणार निर्णय

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिकेची सर्वसाधारण सभा; राधाकृष्ण योजनेच्या डीपीआर वरून वादाची शक्यता विविध १९ विषयांवर होणार निर्णय

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज (सोमवार, दि. २० जुलै) दुपारी १२.१५ वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत मूळ कार्यपत्रिकेतील ७ आणि पुरवणी कार्यपत्रिकेतील १२ अशा एकूण १९ विषयांवर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
सभेतील प्रमुख विषयांमध्ये महापालिकेच्या व्यापारी गाळ्यांचे भाडे कमी करून फेरनिविदा काढणे, महासत्ता चौकाच्या सुशोभीकरणाबाबत निर्णय, संविधान चौक किंवा अशोकस्तंभ उभारणीच्या मागणीवर विचार, स्मशानभूमीतील अस्थी व राखेचा वैज्ञानिक पद्धतीने वृक्षसंवर्धनासाठी वापर, भगतसिंग उद्यान व राणी बाग येथे नाममात्र प्रवेश शुल्क आकारणी, रमाई आवास योजनेतील उर्वरित घरकुलांचे काम आणि भगतसिंग उद्यान परिसरात खाऊ गल्ली सुरू करण्याचा प्रस्ताव यांचा समावेश आहे.
पुरवणी कार्यपत्रिकेतील सर्वाधिक महत्त्वाचा विषय म्हणजे कृष्णा नदीवरून राधाकृष्ण मंदिर (जुने दानवाड उद्भव) येथून इचलकरंजी शहरासाठी नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे.
याशिवाय ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत पर्यावरणपूरक विकासकामे, महिला व युवतींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, हिरकणी कक्ष व अत्याधुनिक स्वच्छतागृहे, अंगणवाडी इमारती, अंगणवाडी विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक विकास किट, विविध उद्यानांमध्ये ओपन जिम व खेळणी, जवाहरनगरसह प्रत्येक झोनमध्ये अभ्यासिका व वाचनालय, रमाई आवास घरकुलांना वीजपुरवठा, जीर्ण शौचालय इमारत निर्लेखित करणे, मटन-चिकन व मासेविक्रेत्यांच्या परवाना शुल्कात वाढ तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या नियामक मंडळासाठी दोन प्रतिनिधींची निवड आदी विषयांवरही चर्चा होणार आहे.
शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रस्ताव आजच्या सभेत चर्चेला येणार असल्याने या सभेकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

सुळकुड योजनेच्या पाठपुराव्याचा ठराव व राधेकृष्णचा डीपीआर.

१२-५ च्या सभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने सुळकुड योजनेचा पाठपुरावा करण्याचा ठराव केला त्यानंतर तो ठराव लवकर लिहिला गेला नाही गेल्या आठवड्यात त्या ठरावावर महापौरांची सही झाली मात्र त्यामध्ये सुळकुडसह अन्य योजना शासनाने मंजूर केल्यास त्याचा पाठपुरावा करण्याची ओळ घातली गेली यावरून आज सभागृहात विरोधक काय करतात याकडे जनतेचे लक्ष लागले असून,सुमारे ५०० कोटीची योजनेचा भार कसा पेलवणार याचेही विचारमंथन होणे आवश्यक आहे.

सुळकुडचा ठराव की कार्यालयीन प्रस्ताव

सुळकुडबाबत केलेला ठराव वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण बदल करून ठरावात कार्यलयीन टिप्पणी घातली असून हा सभागृहाचा ठराव की कार्यालयीन टिप्पणी अशी चर्चा जाणकार नगरसेवकांनी व्यक्त केली.

नगरसेवकांच्या अधिकारात प्रशासनाची लुडबुड

सभागृहात आलेल्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे यासाठी सभा आयोजित केल्या जातात,त्यामध्ये केलेले ठराव चुकीचे अथवा नियमानुसार नसल्यास त्याबाबत विभागीय आयुक्तांकडे स्थगिती मागण्याचा अधिकार आयुक्तांना असतो,मात्र ठराव नियमनुसार व वेळेत लिहिले जात नसून त्यामध्ये प्रशासन विनाकारण हस्तक्षेप करत असल्याने काही ज्येष्ठ नगरसेवकांनी काही दिवस पालिकेकडे पाठ फिरवली तर सगळं प्रशासन करणार असेल तर नगरसेवकांनी सभेला फक्त वडापाव खायला यायचे का अशी संतप्त भावना नगरसेवकात उमटत आहे.

प्रभाग समितीच्या नेमणुका कधी?

मनपा निवडणुका झाल्यानंतर ६ महिने होत असताना प्रभाग समिती मध्ये अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या न केल्याने तसेच प्रभाग समितीच्या बैठकाही न झाल्याने विकासकामांत अडथळे निर्माण होत आहेत,याबाबत लवकर निर्णय होऊन प्रभागातील कामांना गती मिळावी अशी नगरसेवकांची अपेक्षा आहे.

भाजपसमोर एकसंघतेचे आव्हान

स्थायी समिती सभेत हाळवणकर-आवाडे मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर मनपा सभेत भाजपसमोर एक्ससंघता दाखवण्याचे आव्हान असून विरोधकानी आतापर्यत वेट अँड वॉच करून निर्णय घेतला असला तरी आजच्या सभेत विरोधक सत्ताधाऱ्यांना कसे घेरतात याचीही उत्सुकता आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा