राजवाड्याच्या प्रांगणात DKTEच्या ७३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये DKTE सोसायटीच्या विविध शैक्षणिक शाखांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. राज्य गुणवत्ता यादीत ६, तर जिल्हा गुणवत्ता यादीत ५४ असे एकूण ६० विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. या यशाबद्दल १६ ऑगस्ट रोजी राजवाडा, इचलकरंजी येथील ऑडिटोरियम हॉलमध्ये भव्य गुणगौरव सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात आपटे वाचन मंदिर ते राजवाडा अशा ढोल-झांजांच्या गजरातील विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने झाली. त्यानंतर सरस्वती पूजनाने गुणगौरव सोहळ्यास प्रारंभ झाला. इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक नंदकुमार गाडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
शिष्यवृत्ती परीक्षेतील ६० गुणवंत विद्यार्थ्यांसह नव्याने प्रवेश घेतलेल्या व समान गुण मिळविलेल्या १३ विद्यार्थ्यांचा, अशा एकूण ७३ विद्यार्थ्यांचा पालकांच्या उपस्थितीत वैयक्तिक सत्कार करण्यात आला. तसेच मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात DKTEच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशामागे विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे संयुक्त योगदान असल्याचे सांगितले.
संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व विभागप्रमुखांचे अभिनंदन केले. आमदार प्रकाशआण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन एम. आर. घुबडे व व्ही. आर. चव्हाण यांनी केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







