‘चला वाचूया’ लायन्स वाचन स्पर्धेचा निकाल जाहीर
इचलकरंजी : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि सुट्टीच्या काळात पुस्तकांशी नाते दृढ व्हावे, या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी (वर्ष २०२५-२६) व आपटे वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला वाचूया’ लायन्स वाचन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांनी सुट्टीत तब्बल दहा पुस्तके वाचून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्राथमिक गटात ओम सागर पुजारी याने प्रथम, उझेर रियाज बाणदार याने द्वितीय, तर सई प्रदीप सुतार हिने तृतीय क्रमांक मिळविला. माध्यमिक गटात चैतन्या शांतीनाथ दानोळे हिने प्रथम, स्वरा शीतल सोलगे हिने द्वितीय, तर ज्ञानेश्वरी संतोष आबाळे हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत.
दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. मथुरा हायस्कूलने उत्कृष्ट शाळेचा मान मिळविला. वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण माजी मुख्याध्यापक सुनील पाटील व प्रा. विद्या किरण शेवाळे यांनी केले.
क्रमांक हा यशाचा एक टप्पा असून पुस्तक वाचनाची सवय लागणे हीच विद्यार्थ्यांची खरी कमाई असल्याचे परीक्षकांनी सांगितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







