ICHMH51NEWS.IN
9921600800

ई-बसस्थानकाच्या नामकरणावरून महासभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ई-बसस्थानकाच्या नामकरणावरून महासभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

उपमहापौर अनिल डाळ्या आणि उदयसिंग पाटील यांच्यात शाब्दिक वाद; छत्रपती संभाजी महाराज ई-बसस्थानक नामकरणाला बहुमताने मंजुरी
इचलकरंजी:
 महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्याने सुरू होणाऱ्या ई-बसस्थानकाच्या नामकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. या विषयाच्या चर्चेदरम्यान उपमहापौर अनिल डाळ्या आणि विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांच्यात शाब्दिक वादाला उधाण आले. काही नगरसेवकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध ४३ विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या विषयावरून विरोधकांनी सत्ताधारी गटाला घेरण्याचा प्रयत्न केला.यामध्ये महाराष्ट्र शासनाकडे कलम ४५१ अंतर्गत प्रस्ताव प्रलंबित असताना इतिवृत्त कायम कसे करता येईल यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चर्चा झाली.मतदानाद्वारे विषय मंजूर करण्यात आला.
नव्याने सुरू होणाऱ्या ई-बसस्थानक आणि सोलगे मळ्यातील ई-बस चार्जिंग स्टेशनच्या नामकरणाचा विषय चर्चेला आला असता विरोधकांनी ‘छत्रपती संभाजी महाराज ई-बसस्थानका’ऐवजी ‘श्री शिवतीर्थ ई-बसस्थानक’ असे नामकरण करण्याची मागणी केली. शहरात यापूर्वीच संभाजी चौक आणि श्री शंभुतीर्थ चौक अशी नावे असल्याने बसस्थानकाला पुन्हा छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिल्यास नागरिक व प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचे विरोधकांनी सांगितले.
मात्र, सत्ताधारी गटाने ही मागणी फेटाळून लावत मतदानाची मागणी केली. मतदानात बहुमताने ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ई-बसस्थानक, शिवतीर्थ इचलकरंजी’ असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच सोलगे मळ्यातील चार्जिंग स्टेशनला ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी ई-बस चार्जिंग स्टेशन’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आरक्षित जागांच्या प्रश्नावर नगररचना विभागाला सत्ताधारी व विरोधी नगरसेवकानी धारेवर धरले
शहरातील आरक्षित जागांच्या भूसंपादनाच्या विषयावरही सभेत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. नगरसेवक रवि रजपुते, तानाजी पोवार, राजू बोंद्रे, विरोधी पक्षगटनेते उदयसिंग पाटील, मदन कारंडे, संजय तेलनाडे यांच्यासह अनेक सदस्यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारला.
आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात जाईपर्यंत संबंधित विभाग काय करत होता,असा सवाल उपस्थित करण्यात आला. आरक्षित जमिनींच्या प्रकरणांमध्ये महापालिकेतील बारनिशीपासून नगररचना विभागापर्यंत दलालांची साखळी कार्यरत असल्याचा गंभीर आरोपही सभेत करण्यात आला. गोरगरीब शेतकऱ्यांची आरक्षित जमीन कवडीमोल दराने खरेदी करून ती व्यापारी दराने विकली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौर उदय धातुंडे यांनी संबंधित विभागाची लवकरच बैठक घेऊन आरक्षित जमिनींबाबत ठोस धोरण निश्चित करण्याचे आश्वासन दिले.दोषी कर्मचारी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शैक्षणिक साहित्याच्या मुद्द्यावर शिक्षण सभापती आक्रमक
शिक्षण सभापती विद्या साळुंखे यांनी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सभागृहातील अपमान सहन केला, मात्र विद्यार्थ्यांचे दायित्व आमच्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार पाठपुरावा करूनही शैक्षणिक साहित्य वितरणासह विविध विषयांवर निर्णय होत नसल्याने आयुक्त आणि महापौरांनी संबंधित विषयांना मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नगरसेवक प्रदीप धुत्रे यांनी सरस्वती हायस्कूलजवळील भाजी मार्केटचा प्रश्न उपस्थित केला. शहरातील अन्य भाजी मार्केटप्रमाणे या मार्केटचेही काम सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
वार्षिक योजनेच्या कामांवरूनही विरोधक आक्रमक
सर्वसाधारण वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने विकासकामे निश्चित करण्याच्या विषयावरही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. पालकमंत्री, आमदार आणि खासदार यांच्या कोट्यानुसार कामांसाठी प्रस्ताव देण्याबाबत आयुक्त पल्लवी पाटील यांनी माहिती दिली. यावर विरोधी नगरसेवकांनी असा कोणताही ‘कोटा’ नसल्याचा दावा करत प्रस्ताव मागविण्याच्या विषयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सभागृह नेते विठ्ठल चोपडे, परिवहन सभापती अरुणा बचाटे, नगरसेविका अलका स्वामी, नगरसेवक प्रदीप धुत्रे, सुशांत कलागते, सचिन राणे, अमरजित जाधव, अविनाश कांबळे, सयाजी चव्हाण, मारुती पाथरवट, विजया महाजन, स्वाती लोखंडे यांच्यासह अनेक सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

टीडीआर विक्री साठी प्रयत्न करावेत,रस्ता प्रस्ताव सहपालकमंत्री यांच्या आदेशानेच-आयुक्त पल्लवी पाटील.

टीडीआर विक्री साठी सर्वानी पुढाकर घेणे गरजेचे असून त्यातून मनपास बऱ्यापैकी उत्पन्न मिळेल याबाबत स्पष्टीकरण देताना आयुक्त पल्लवी पाटील यांनी नगरसेवकांच्या शंका दूर केल्या. तसेच रस्ते पुनर्बांधणी बाबत सहपालकमंत्री यांच्या कार्यालयातुन आदेश आल्याने त्यानुसार रस्ते निश्चित करत असून यामध्ये बदल करायचे असल्यास ते करून पाठवता येतील असे विरोधकांच्या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी सांगितले.

दंत महाविद्यालयात जागेवरून विरोधी पक्ष आक्रमक

दंत महाविद्यालयासाठी आरक्षण टाकलेल्या जागेवरच परत आरक्षण टाकत असल्याने तेथील कुटुंबाची अवस्था माणूस म्हणून बघा असे संजय तेलनाडे यांनी मांडल्यावर सभागृहाबाहेर उपस्थित नागरिकांनी घोषणाबाजी सुरू केल्याने अखेर महापौरांनी विषय पुढील मिटींगला घेण्याची घोषणा केली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा