ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत ७ महिन्यात ३३६१ कुत्र्यांवर नसबंदी, तरीही भटक्या कुत्र्यांची दहशत कायम!  विशेष वृत्त -अभिजित पटवा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ७ महिन्यात ३३६१ कुत्र्यांवर नसबंदी, तरीही भटक्या कुत्र्यांची दहशत कायम! 

विशेष वृत्त -अभिजित पटवा

सात महिन्यांत ७४७ जण रुग्णालयात दाखल; ३२६२ जणांना लस — महापालिकेच्या उपाययोजनांवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

इचलकरंजी : शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार गेल्या सात महिन्यांत तब्बल ३३६१ नर व मादी कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने नसबंदी करूनही शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचे कळप वाढताना दिसत असल्याने महापालिकेच्या उपाययोजनांच्या प्रभावीतेबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

रुग्णालयातील आकडे चिंताजनक

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात गेल्या सात महिन्यांत ७४७ रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले, तर ३२६२ नागरिकांना लस देण्यात आली. यावरून भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण झालेल्या समस्येची तीव्रता लक्षात येते. याशिवाय शहरातील अनेक नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याने त्यांची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बाधित नागरिकांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

चौकट : सात महिन्यांची स्थिती

३३६१ — नसबंदी करण्यात आलेले कुत्रे
७४७ — इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्ण
३२६२ — लस देण्यात आलेले नागरिक

नसबंदी होतेय, मग संख्या वाढतेय कशी?

महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची नसबंदी करण्यात आल्याचा दावा केला जात असताना शहरातील रस्ते, गल्लीबोळ, कचरा पॉईंट आणि हातगाड्यांच्या परिसरात कुत्र्यांचे कळप वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नसबंदीची प्रक्रिया प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवली जाते, कोणत्या भागातील किती कुत्र्यांवर नसबंदी झाली, त्यांची नोंद कशी ठेवली जाते आणि नसबंदीनंतर त्यांचे पुनर्वसन कसे केले जाते, याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नसबंदीचे आकडे केवळ कागदोपत्री राहू नयेत, तर त्याचा परिणाम शहरातील कुत्र्यांच्या संख्येवर प्रत्यक्ष दिसला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

शेल्टर हाऊसचे आश्वासनही हवेतच

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून कचरा डेपोलगत शेल्टर हाऊस उभारण्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप ठोसपणे झालेली दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.कचरा व्यवस्थापन, अन्नाची उपलब्धता, कुत्र्यांचे निर्बीजीकरण, त्यांचे पुनर्वसन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना या सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे.

नागरिकांचा सवाल : ठोस कारवाई कधी?

शहरातील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांना भटक्या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर मोठ्या संख्येने कुत्र्यांचे कळप फिरताना दिसतात. दुचाकीस्वारांच्या मागे धावणे, रस्त्यावर अचानक येणे आणि नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

महापालिकेने केवळ आकडेवारी जाहीर करण्यापेक्षा नसबंदीची प्रत्यक्ष पडताळणी, कुत्र्यांची संख्या मोजणी, शेल्टर हाऊसची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

३३६१ कुत्र्यांवर नसबंदी झाल्यानंतरही समस्या कायम असेल, तर या उपाययोजनांचा नेमका परिणाम काय? हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, इचलकरंजीकरांना भटक्या कुत्र्यांच्या दहशतीतून मुक्ती कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अबाल वृद्ध,लहान मुले व महिलांना धोका

शहरातील अबाल वृद्ध,महिला व लहान मुलांना याचा जास्त धोका असून मुलांचे खेळण्याचे स्वातंत्र्य हिरावत चालल्याची परिस्थिती आहे, रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाताना वाहनचालकाना रस्त्यावरील खड्ड्याबरोबर कुत्र्यांपासूनही सावध राहावे लागत आहे

मक्तेदारावर कुणाचा वरदहस्त

प्रशासनाच्या मर्यादित नसबंदी ठेका व मक्तेदाराच्या संथ कामामुळे वर्षभरापूर्वी टेंडर रद्द करून नविन ठेकेदार नेमण्यात येणार असल्याने तोपर्यत मुदतवाढ दिली होती मात्र नविन टेंडर प्रोसेस न करता समाधानकारक काम  नसलेल्या मक्तेदारास कोण पाठीशी घालत आहे व कुणाच्या वरदहस्ताने तो कार्यरत आहे याबाबत नागरिक चर्चा करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा