इडीला घाबरून पक्षप्रवेश करणाऱ्या उमेदवाराला भाजपची साथ,प्रामाणिक मदन कारंडेना निवडून देण्याचे खासदार सुप्रिया सुळेंचे आवाहन.





इचलकरंजी :
येथील स्थानिक अपक्ष आमदारावर भाजपने २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीआधी २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.तत्कालीन आमदारांनी त्यांची विविध भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या होत्या.मात्र निवडून आल्यावर भाजपला पाठिंबा देण्याच्या अटीवर सर्व काही गुंडाळून त्यांनाच पक्षात घेऊन त्यांच्या पुत्राला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे,असा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.
इचलकरंजी येथील काँग्रेस कमिटी मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या समर्थनार्थ खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, दोन हजार कोटी रुपये खर्च करून आमदार फोडत ते उधळत महाविकास आघाडीचे सरकार पाडले.हे सरकार इन्कम टॅक्स,सीबीआय व ईडीवर चालणारे सरकार आहे असा आरोप सुळे यांनी केला. भ्रष्टाचार मुक्त भारत असे भाजपचे घोषवाक्य आहे मात्र सर्व भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात प्रवेश कसा काय मिळतो?असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला.महाविकास आघाडीचे सरकार राज्यसह केंद्रात आले तर भ्रष्टाचार मुक्त भारत करणार असे आव्हान ही सुळे यांनी केले.
दरम्यान,लोकसभेला महाविकास आघाडीला जनतेने मोठा प्रतिसाद दिल्यानंतर महायुती सरकारला लाडकी बहीण योजना आठवली असल्याचा आरोप सुळे यांनी यावेळी केला. नगरसेवक म्हणून निवडून आलेले मदन करंडे यांना यावेळी आमदार करा ते शहराचा महत्त्वाचा असा पाणी प्रश्न निवडून आल्यानंतर विधानसभेमध्ये सोडवुन देतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये कोरोना सारख्या महामारीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चांगले काम केले. दरम्यान,अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर भाजप पक्षाने आधी उद्धव ठाकरे यांचे त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार फोडले. परंतु, त्यांना नागरिकांचे मत फोडता आले नाही. त्यामुळेच त्यांना जनतेने लोकसभेमध्ये त्यांची जागा दाखवली. लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या यशानंतर त्यांना विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकावी लागली आणि विधानसभेत पराभव होईल या उद्देशानेच महिलांसाठी योजना आणावी लागली.तरीही महाविकास आघाडीला विधानसभेत मोठे यश मिळेल असे आश्वासन मदन कारंडे यांनी दिले. तसेच तारदाळ व खोतवाडी या गावालाही पिण्याच्या पाण्याची अडचण होत होती परंतु , त्या ठिकाणीही एक दिवस आड पाणी देण्याचे काम आपण केले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.यावेळी हिंदुराव शेळके, काँग्रेसचे राहुल खंजिरे, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, माजी नगराध्यक्ष मेघा चाळके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सयाजी चव्हाण,अजितमामा जाधव,सदा मलाबादे,माजी नगरसेवक उदयसिंग पाटील,अब्राहम आवळे,मंगेश कांबुरे,अमरजीत जाधव,अभिजित रवंदे,गौरी कारंडे,रजनी शिंदे,बिस्मिल्ला गैबाण,सुनीता मोरबाळे, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शरद कांबळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही यावेळी पक्षप्रवेश केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







