डीकेएएससी मध्ये ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धां’चे उद्घाटन संपन्न.
इचलकरंजी :
इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी येथे स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह अंतर्गत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धांच्या शाखा पातळीवरील स्पर्धांचा शुभारंभ प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या सप्ताहात विद्यार्थी आणि गुरुदेव कार्यकर्ते यांच्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला, सुगम गायन व कराओके अशा विविध स्पर्धा महाविद्यालयातील वांग्मय मंडळ व सांस्कृतिक विभागाच्या वतीने संपन्न होणार आहेत. तर ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ परीक्षण सादरीकरण स्पर्धा संपन्न होणार आहे. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर म्हणाले, ” स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचा हेतूच विद्यार्थी आणि गुरुदेव कार्यकर्त्यांमध्ये स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे विचार आणि कार्याची उजळणी व्हावी व बापूजींनी दिलेली सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग आणि पिळवणुकीस आळा ही पंचसूत्री सर्वांनी आत्मसात करावी यासाठी आहे. विविध स्पर्धांचे विविध विषय हा हेतू साध्य करण्यासाठी आपल्यासमोर दिलेले असतात. विद्यार्थीदशेत सुसंस्कार झाले की भविष्यात चांगला समाज निर्माण होऊ शकतो. सप्ताह म्हणजे सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी दिलेली शिदोरी आहे.”
समारंभाचे स्वागत डॉ. पी. ए. पाटील यांनी तर प्रास्ताविक प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी केले. आभार डॉ. अंजली उबाळे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. रोहित शिंगे यांनी केले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी. के. वाघमारे, ग्रंथपाल प्रा.व्ही. पी. यादव यांच्यासह प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800